पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कधी गोड असत नाही; जे कठोर क्लेशदायक तेच अंती फायद्याचे अशी आत्मक्लेशवादी नीतिमत्ता घरी आईबाप, शाळेत गुरुजन आणि पुस्तकात सानेगुरुजीपासून सर्व थोरथोर मंडळी निक्षून सांगत असत.
 मुंगीच्या उद्योगप्रियतेचा मला मनापासून तिटकारा येई. या एका मुंगीमुळे खेळण्याबागडण्याचा सगळा आनंदच कोमेजून जातो. ही मुंगीसुद्धा जर टोळाप्रमाणे गंमत करत फिरली असती तर तिचे उदाहरण देऊन वडीलधाऱ्या मंडळींना आपल्याला बोलताच आले नसते, असे वाटे.
 आत्मक्लेशाचे तत्त्वज्ञान
 खेळण्याऐवजी घरात येऊन वाचायला बसले तरी 'आत्मपीडा म्हणजेच कल्याण' या बोधतत्त्वाचा ससेमिरा चुकत नसे. काय वाचतो आहे याकडे मोठ्या मंडळींचे बारकाईने लक्ष असे. गणित, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल असले काही नीरस पुस्तक समोर घेऊन बसलेला मुलगा गुणी, शहाणा आणि आदर्श. इतिहासाचे पुस्तक काढले याचा अर्थ त्यातले त्यात 'कथा रम्या' वाचून करमणूक करण्याचा प्रयत्न चालला आहे असा गंभीर आरोप येई. मराठीचे धडे वाचणे म्हणजे तर अभ्यासाच्या नावाने निव्वळ फसवणूक. 'किती माझा कोंबडा हो शहाणा' अशी कविता म्हटली म्हणजे तो उनाडपणा. त्याबरोबर 'कोंबडा म्हणजे पक्षिविशेष' असे निरर्थक आणि न समजणारे पाठांतर केले म्हणजे 'पोरगे अगदीच काही कामातून गेलेले नाही', अशी थोड्याफार संतोषाची छटा आईबापांच्या चेहऱ्यावर उठे. इंग्रजीच्या अभ्यासाला मोठा मान होता. इंग्रजी वाचतो म्हणजे 'पोरगा नाव काढणार' अशी प्रशस्ती होई. त्यामुळे गोड गोष्टी वाचणारा मुलगा उनाड अशी निर्भर्त्सना आणि इंग्रजीतील परीकथा वाचणारा मुलगा अभ्यासू अशी वाखाणणी होत असे.

 आमच्या काळी चिंतामणी द्वारकानाथ देशमुख (आय.सी.एस.) रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (निवृत्तीनंतर भारताचे अर्थमंत्री) यांचे मोठे कौतुक होते. मॅट्रिक च्या परीक्षेत त्यांनी ९०% मार्क मिळवून उच्चांक स्थापला होता. तो आमच्या काळापर्यंत तरी कोणी मोडला नव्हता. मॅट्रिकच्या परीक्षेतील त्यांच्या देदीप्यमान यशावर खुद्द गोविंदाग्रजांनी एक लांबलचक कविता लिहिली होती. सी. डी. देशमुख म्हणजे कुलभूषण; 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' मुंगीप्रमाणेच देशमुखांच्या उदाहरणाने आमचे लहानपण खूपच खराब केले. या बाळाने कधीकाळी म्हटले म्हणे, "आवडणारी गोष्ट कोणीही करेल न आवडणारी गोष्ट करून दाखवण्यातच मोठेपणा आहे."

अन्वयार्थ - एक / २३०