पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






उद्योगी टोळ आणि आळशी मुंगी


 कार्ट्यांनो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते हुंदडत असता, काही अभ्यास वगैरे कराल की नाही? पुढे काय भिका मागायच्या आहेत काय? खेळून काय पोट भरणार आहे?"
 माझ्या पिढीतल्या अनेकांच्या बालपणातील सगळ्या आठवणी आईबापांच्या असल्या वाक्ताडनाने झाकळलेल्या आहेत.
 "चांगली मुले अभ्यास करतात, परीक्षेत पास होतात, नाव कमावतात, पैसा कमावतात, घराण्याचे नाव उज्ज्वल करतात; उंडगी मुले हुंदडण्यात वेळ घालवतात, परीक्षेत नापास होतात, आयुष्याची धुळधाण करून घेतात."
 अशा बोधवाक्यांबरोबर 'मुंगी आणि टोळ' ही जगातील सगळ्या देशांत सगळ्या भाषांत सांगितली गेलेली 'उद्योगप्रशंसा' आणि 'उताडनिंदा' करणारी कथा वारंवार ऐकावी लागे. मुंगीने वर्षभर कष्ट करून धान्याची बेगमी केली, टोळ मात्र वर्षभर टोळभैरवी करत राहिला; पावसाळा आल्यावर त्याला मुंगीकडे मदत मागण्यासाठी जावे लागले आणि मुंगीने त्याची याचना झिडकारून त्याला हाकून लावले, टोळ भुकेने, थंडीने मरून गेला, अशी ही थोडक्यात कथा.
 वडीलधाऱ्यांच्या या सतत बोलण्याने चार धूर्तीशी गाठ पडलेल्या ब्राह्मणासारखी मुलांची स्थिती व्हायची.खांद्यावरील कोकरू कुत्रेच असले पाहिजे असे चौघांच्या सतत सांगण्यावरून पटलेला ब्राह्मण कोकरू टाकून देतो, त्याप्रमाणे आम्ही खेळ टाकून अभ्यासाच्या मागे लागलो.
 स्वादु हितंच दुर्लभम्

 खेळताना आनंद वाटतो; अभ्यास करताना कष्टदायी वाटते, नको नकोसे वाटते. त्याअर्थी खेळ हा विनाशकारी असला पाहिजे अणि अभ्यास अंततोगत्वा हितकारी असला पाहिजे असा वडीलधाऱ्या मंडळींचा निष्कर्ष असे. औषध

अन्वयार्थ - एक / २२९