पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डरे' अशी एक समजूत आहे. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून कोणी फिरू लागला तर पाहणाऱ्याने लाजावे असा शिष्टाचार मुख्यमंत्री पाळत आहेत, अशी आणखी एक कल्पना आहे. नामांतर प्रश्नावर सगळ्या मराठवाड्याला लष्करी छावणीचे रूप देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, बाळासाहेबांच्या अटकेनंतर दंगे झाले तर ते आटोक्यात आणता येणार नाहीत हे काही खरे नाही. लष्कराला भिंद्रानवालेचा बंदोबस्त करता आला, मग कलानगर हे काही अकाल तख्तापेक्षा कठीण रणक्षेत्र नाही. आणखीन एक जनापवाद आहे. बाळासाहेबांविरुद्ध हात उचलण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत होत नाही. बाळासाहेबांनी नुसते तोंड उघडले तर दिल्लीच्या सिंहासनाकडे पाहून तोंडाला पाणी सुटलेल्या मुख्यमंत्र्यांना साधे जगणे मुश्कील होईल.
 ठाकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना धास्ती वाटते
 १९७९ मध्ये निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, 'विरोधकां'ना तात्पुरते तुरुंगातून सोडले आहे, कारण तुरुंगाची डागडुजी चालू आहे. बाळासाहेबांनी मौन सोडले तर डागडुजी करून सज्ज झालेला येरवड्याचा तरुंग आपली दारे उघडील. बाळासाहेबांना अटक आणि शिक्षा काही महिना, दोन महिन्यांची होईल, मुख्यमंत्री किती काळ आत बसतील ते सांगता येत नाही, अशा धास्तीने मुख्यमंत्री ठाकऱ्यांविरुद्ध कारवाई करत नसावेत असा पुष्कळांचा तर्क आहे.
 शिवसेना परराष्ट्र खात्याच्या अखत्यारीत
 ठाकरेंना अटक करण्याची मुख्यमंत्र्यांना हिंमत होत नाही याचे खरे कारण वेगळे आहे. रक्त, घाम सिंचून पिकवलेल्या कापसाला दोन पैसे जास्त मिळावे म्हणून शेतकरी राज्याची सरहद्द ओलांडायला निघाला तर हजारो शिपायांची फौज अमरावती, अकोल्याला उतरवणारे मुख्यमंत्री, बाळासाहेबांसमोर हातपाय गाळून बसतात. याचे कारण मुंबईच्या छापखान्यातील घटनेत स्पष्ट झाले. शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना ही माफिया सरकार आहे. त्यांचे समांतर सरकार घट्ट, मजबूत, सर्वदूर प्रस्थापित झालेले आहे. बाळासाहेबांना अटक करायची म्हणजे दोन समांतर सरकारांतील युद्धप्रसंग आहे आणि असले युद्ध उभे करणे मुख्यमंत्र्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला परवडणारे नाही.

(१७ मार्च १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २२८