पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/217

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. प्रत्येक प्राणिमात्राच्या आयुष्यात शरीर मोहरून टाकणारी तारुण्याची चाहूल या अभागी जिवांच्या आयुष्यात मोठे बीभत्स रूप घेऊन येते. बुद्ध्यांक ३० टक्केसुद्धा नसलेल्या या मुलींच्या आयुष्यात गर्भाशय काढून टाकल्याने त्यांची निसर्गदत्त कमतरता अधिक वाढणार आहे असे नाही.
 खासगीत ढवळाढवळ नको
 तरीही हा वादाचा विषय का बनला? कोणत्याही रोग्याच्या बाबतीत उपचारासाठी शस्त्रक्रिया करणे हे केवळ रोगी, पालक आणि डॉक्टर यांनी ठरवायचे असते. वर्तमानपत्रातील प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रकरणी विनाकारण नाक खुपसणाऱ्या तथाकथित सामाजिक संस्थांना आणि त्यांच्या म्होरक्यांना या निर्णयात नाक खुपसून ढवळाढवळ करण्याचे काहीच कारण नाही.
 'करिअर' महत्त्वाची
 या उचापत्यांचा गोंगाट ऐकून मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रियांना स्थगिती द्यावी यात काही आश्चर्य नाही. लोकप्रिय नेते बनण्याचा हा मार्ग आहे अशी त्यांची धारणा आहे. ती चूक आहे असे कोण म्हणेल? आजपर्यंत त्यांना उदंड यश मिळाले आहे. लोकप्रियतेपोटी किंवा उपद्व्यापांचा कल्लोळ थांबवण्यासाठी आपण जे करू त्याचा उद्या काय परिणाम होईल याची चिंता करणारे राजकारणात येत नाहीत आणि राजकारणात उतरलेल्यांना असल्या चिंता स्पर्शच करीत नाही.
 या राजकारणी खेळांच्या चक्रात सापडलेल्या अपंग मुली; त्या काहीच तक्रार करीत नाहीत; यांना काय घडते आहे त्याची काहीच जाण नाही. दैवाने मुलीचा जन्म दिला, वर अपंगत्व दिले आणि आता पुढाऱ्यांच्या खेळात त्या सापडल्या. आश्रमशाळेत अपुऱ्या अस्वच्छ जागेत काळजी घेणारे थोडे. अन्नपाण्याचीही चणचण आणि दुष्काळात तेरावा महिना, वयाबरोबर जाण नसलेले शरीर बंड करून उठू लागले म्हणजे त्यांचे जगणे आणखीनच वेडेबागडे आणि ओंगळवाणे होणार. अकरापैकी दोन मुलींच्या आई-बापांनी या शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत असा आग्रह धरला आहे; पण स्वयंप्रतिष्ठित संस्था आणि स्वयंमान्य मुख्यमंत्री यांच्यापुढे त्यांचे काय चालणार आहे? त्या दुर्दैवी मुलींचे काहीही होवो, हा प्रश्न नेत्यांच्या 'करिअर'चा आहे.

(२५ फेब्रुवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २१८