पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 राजमान्यांची व्यथा
 पण या दुर्दैवी घटनेने मतिमंद मुलांच्या प्रश्नाकडे थोडे लक्ष वेधले गेले हे काही कमी नाही. मतिमंद मुलींना आश्रमशाळेत सोडल्यानंतर त्यांची विचारपूस करायला पुष्कळदा त्यांचे जन्मदाते आई-बापदेखील येत नाहीत. आई-बाप आले तर ही पोरे बहुधा त्यांना ओळखूदेखील शकत नाहीत. शस्त्रक्रियेला विरोध करणाऱ्या सामाजिक संस्थांनी या मतिमंद मुलींची विचारपूस कधी पूर्वी केली होती असे नाही आणि त्यांची जबाबदारी घेतो, शस्त्रक्रिया करण्याची काही गरज नाही असेही त्यांनी म्हटले नाही.
 योगायोगाची गोष्ट अशी, की पहिल्या पानावर हे प्रकरण गाजत असताना वर्तमानपत्रांच्या आतल्या पानावर एक छोटीशी बातमी आहे. सोलापूरच्या 'जिव्हाळा' या मतिमंद मुलांच्या शाळेचे प्राचार्य अण्णाराव राजमाने यांना त्यांच्या अपंग सेवेबद्दल १९९३ सालचा एक पुरस्कार मिळाला. त्याप्रसंगी राजमाने म्हणाले, 'वर्षानुवर्षे घसाफोड करूनही शासनाने अपंगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडे दर्लक्ष केले आहे. या मुलांच्या जेवणा-खाण्याचा खर्च शासनाकडून मिळत नाही. शिक्षकांचा पगार मिळत नाही, मतिमंद मुलांचे पालनपोषण ही अतिशय कठीण, जोखमीची कामगिरी. काम करणारे अक्षरशः बेजार होतात. प्रौढ झाल्यानंतर या मुलांचे काय होणार याची मोठी चिंता वाटते."
 क्रूरकर्मा ईश्वर

 सुप्रसिद्ध पत्रकार अरुण शौरी यांचा मुलगा जन्मजात अपंग आहे. त्यांनी अलीकडे लिहिले, की 'या अपंग मुलांकडे पाहिल्यानंतर विश्वात कोणी सर्वज्ञाता, सर्वशक्तिमान आणि दयाळू परमेश्वर असेल ही कल्पनाच अशक्य वाटते. अशा अजाण अर्भकावर एवढा दुष्ट घाव घालून त्या जगन्नियंत्याला काय आनंद मिळत असेल? त्याचे समर्थन कशानेच होणार नाही." शौरींसारखे अनेक आई-बाप, अपंगांच्या संस्थांना निरलसपणे काम करणाऱ्या सिंधुताई जोशींसारख्या अनेक कार्यकर्त्यां दैवानेच घात केलेल्या या कोवळ्या जिवांचे आयुष्य थोडेतरी सुसह्य करण्यासाठी जिवाचा आकांत करीत असतात. ही मुले कधीकाळी मोठी होतील आणि परिपूर्ण जीवन जगू शकतील याची आशा जवळजवळ शून्य, त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेता आली तरी खूप झाले अशी त्यांची काळजी घेणाऱ्याची प्रार्थना असते. मतिमंद जन्मलेल्या मुलींचे तर काय दुर्दैव सांगावे! 'अपंग' आणि 'मुलगी' असे दोन असह्य प्रहार झेलून लुळे पांगळे झालेले हे जीव, कधीकाळी मातृत्वाची जबाबदारी स्वीकारू शकतील ही अपेक्षादेखील

अन्वयार्थ - एक / २१७