पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हनुमान गेला नसावा, आला नसावा, द्रोणगिरी आणला नसावा, परत नेला नसावा. फक्त जायचा यायचा, दोन्ही वेळचा प्रवासखर्च आणि वर डोंगरासारख्या सरकारी मालाच्या वाहतुकीचा खर्च 'क्लेम' केला असावा.
 वरच्या लत्ता झेलीत माथा
 राजाची मर्जी देखून सोयीसोयीने बोलणे हाही सरकारी नोकरांचा आणखी एक जातीधर्म. भर दरबारात उपस्थित असलेले, वयाने, तपाने, ज्ञानाने, अनुभवाने श्रेष्ठ असलेले गुरुवर्य काही थोडे नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर दर्योधनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला; पण कोणी एकाने राजाच्या या भयानक विनाशकारी कृत्याबद्दल चकार काढला नाही. आणीबाणीच्या काळात सगळे सरकारी नोकर जसे वागले तसेच भीष्म द्रोणाचार्यादी सर्व गुरुवर्य वागले.
 सवे झाडिती खाली लाथा
 सरकारी नोकर कोणत्याही कामात पैसे खाऊ शकतो, अशी बिरबलाने बादशहाशी पैज मारली. बादशहाने नदीकाठच्या वाळवंटात एक काठी खोचून तिचे रक्षण करण्याची कामगिरी बिरबलाकडे दिली आणि बिरबलाने त्यातूनही मोठी वरकमाई करून दाखवली ही गोष्ट प्रसिद्धच आहे.
 आदर्श सरकारी कार्यालयांची कल्पना अशी; कार्यालयाची इमारत मोठी सुंदर असावी, सर्वांना ऐसपैस जागा, शक्यतो स्वतंत्र स्वतंत्र खोल्या असाव्यात, एअर कंडिशनर नाही तर निदान पंखे डोक्यावर गरगरत असावे, कँटिन चांगले असावे आणि स्वस्त असावे आणि सर्व नोकरदारांनी चहा, कुटाळक्या, स्वेटर विणणे यातून उरलेल्या काळात एकमेकांचे पगार, भत्ते, बदल्या, बढत्या, याबद्दलच्या तक्रारी एवढीच काय ती कामे करावी केवळ एकमेकांचीच कामे करणारी कार्यालये हा सरकारी आदर्श! लोकांशी संपर्क म्हणून असू नये. लोकांनी यावे ते ठक्त वेगवेगळ्या नोकरदारांना त्यांच्या इतमामाप्रमाणे, चिरीमिरीपासून सुटकेसातील देणग्यांपर्यंत, देण्याकरिता यावे हा सरकारी कार्यपद्धतीचा आदर्श.
 नसलेल्या कामाचे ओझे

 'यस् मिनिस्टर!' या गाजलेल्या पुस्तकात सरकारी पद्धतीची अनेक उदाहरणे आहेत. ९०० खाटांचे सुसज्ज इस्पितळ, पण डॉक्टर नसल्यामुळे एकही रोगी दाखल करून घेतला जात नाही आणि तरीही बाकीचा नेमलेला सगळा नोकरवर्ग आपल्याला कामाचे ओझे ठार असल्याची तक्रार करतो

अन्वयार्थ - एक / २०५