पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आईला हक्काची सुटी मिळते. मग डॉक्टरी उपचार थांबवून लोकवैद्यकांकडे ते का वळले?
 गावठी उपाययोजनेचा उपहास करून त्याला मी विरोध करेन अशी त्यांना भीती वाटली असावी; म्हणून मला कोणी काही सांगितलेच नसावे, माझ्या आधुनिकतेच्या दबावाखाली डॉक्टरचा उपचार चालू ठेवावा लागेल आणि त्यामुळे पोराचा त्रास विनाकारण वाढेल अशी त्यांना धास्ती पडली असेल! मला आठवण झाली म्हणून चौकशी केली तेव्हा कळले. लख्खकन प्रकाश पडावा तसे माझ्या ध्यानात आले. निदान भाजण्याच्या प्रकरणात तरी या लोकांच्या डॉक्टरांच्या उपचारावर तितकासा विश्वास नसावा. पोराचा हात वाचवायचा, निदान त्याचे दुःख कमी करायचे असेल तर अगदी साहेबांचासुद्धा आग्रह बाजूला ठेऊन डॉक्टरी उपाययोजना केली पाहिजे आणि खरी चांगली उपाययोजना केली पाहिजे असा त्याचा निश्चय दिसल. मी काहीच बोललो नाही.
 सुशिक्षितांची अंधश्रद्धा
 खेड्यातली माणसे, आदिवासी कोणी आजारी पडले म्हणजे अंधश्रद्धेने मांत्रिकतांत्रिकाकडे जातात, वैदूची जडीबुटी घेतात, असा समज वर्षानुर्षे चालत आला आहे; पण सत्यस्थिती कदाचित नेमकी याच्या उलटी तर नाही ना? कोणी आजारी पडले म्हणजे शहरातील शाळाकॉलेजात शिकलेले सुशिक्षित म्हणवणारे लोक काही विचार न करता अंधश्रद्धेने डॉक्टरकडे जातात, इस्पितळात जातात. हजारो रुपये खर्च केले म्हणजे आपले कर्तव्य आपण बजावले! रोगी बरा होणे न होणे कोणाच्या हाती थोडेच आहे? असे मनाचे समाधान करून घेतात. अंधश्रद्धा, अडाणी कोण? शहरी लोक भले, की ग्रामीण आदिवासी? कांही समजेनासे झाले आहे.
 लोकवैद्यक कसे वाचले

 एक गोष्ट पक्की, विलायती औषधे स्वस्त झाली म्हणजे गोरगरिबांचे कल्याण होईल ही कल्पना खोटी. उलट ती जितकी महाग होतील तितके देशाचे भले होण्याची शक्यता अधिक आहे. देशी प्रभावी औषधोपचाराच्या पद्धतींचा वापर व्हायचा असेल, यांच्याबद्दल संशोधन व्हायचे असेल, तर विलायती औषधे महागच असणे श्रेयस्कर. निदान ती कृत्रिमरीत्या स्वस्त करणे तरी घातक होईल. संकट बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या औषधांच्या महागड्या किमतीचे नाही. संकट देशातील लोकवैद्यक पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट होण्याचे आहे. हा धोका परदेशी संशोधनाची चोरी करून टळणार नाही; देशी पद्धतींच्या वापराने

अन्वयार्थ - एक / २०२