पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'बर्नाल' किंवा काहीच औषध नव्हते. भाजण्याच्या जखमेवर अजिबात पाणी लागू देऊ नये असे माझ्या लहानणपणी डॉक्टर मोठ्या आग्रहाने सांगत असत, आता डॉक्टर नेमके उलटे सांगतात भाजल्याबरोबर जखम झालेला भाग जितका होईल तितका वेळ साध्या स्वच्छ गार पाण्याच्या धारेखाली धरावा अशी आता शिफारस आहे. वर्षादीड वर्षांपूर्वी भजण्याच्या एका प्रकरणाचा जवळून संबंध आल्यामुळे एवढी माहिती मलाही होती. पोराचा हात पाण्याखाली धरायला सांगून त्याची गाडीतून पाठवणी केली. डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले आणि काही मलम लावून पोराला परत पाठवले, घरी लावण्यासाठी औषध लिहूनही दिले. दोन दिवसांनी त्या मुलाला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे नेले, त्याचा बाप पैसे मागण्यासाठी आला; पण सगळा डॉक्टरी खर्च माझ्याकडे आहे, डॉक्टरांनी माझ्या खात्यावर टाकला आहे, हे मी त्याला सांगितले, त्याला त्यातल्या त्यात बरे वाटले असावे. नंतर काही दिवस पोराला डॉक्टरांकडे नेल्याचे माझ्या काही नजरेस आले नाही. चौकशी करता कळले, की पोराला डॉक्टराकडे नेण्याचे बंद झाले आहे आणि काही गावठी उपाय त्यावर चालू आहेत. पहिल्यांदा कोरफडीचा गर जखमेवर लावण्यात आला; मग खेड्यांचे मांस जखमेवर लावण्यात आले. पोरगा नेहमीप्रमाणे खेळतो आहे याचे मला आश्चर्य वाटले. भाजण्याच्या जखमा भरून यायला किती कठीण असतात आणि त्याकरिता दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शने कशी घ्यावी लागतात; ड्रेसिंग किती वेदनाकारक असते हे थोड्याच दिवसांपूर्वी मी डोळ्यांनी पाहिले होते. मग या पोराच्या भाजण्याच्या जखमा एवढ्या लवकर भरून कशा आल्या? सध्या मुलाचा हात बरा दिसतो आहे; तो डॉक्टरांच्या औषधामुळे की खेकड्याच्या मांसामुळे हे सांगणे कठीण आहे!
 अडाण्यांची विचक्षण

 पण मूळ मुद्दा कोणती उपचारपद्धती जास्त परिणामकारक हा नाही. वेगवेगळ्या वैद्यकप्रणालीबद्दल सर्वसाधारण भारतीयांच्या मनातली धारणा या प्रसंगाने स्पष्ट झाली. ती धारणा मोठी विलक्षण आहे. भाजलेल्या पोराचें आईबाप आणि शेजारीपाजारी माणसे काही ठार अडाणी नाहीत. विंचूवगैरे चावला तर मांत्रिकाकडे जाण्याऐवजी डॉक्टरांकडे जाणे श्रेयस्कर हे त्यांना अनुभवाने पटलेले आहे. डॉक्टरांच्या आधुनिक उपाययोजनेचा खर्च परवडत नसल्यामुळे ती थांबवली असेही संभावत नाही, कारण सगळ्या उपचाराचा खर्च मी करणार होतो. डॉक्टरकडे जाण्यायेण्यातही काही मोठा त्रास आहे असे नाही. उलट निदान

अन्वयार्थ - एक / २०१