पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. रशियात पाडाव झाला तो समाजवादाचा नाही. समाजवादी व्यवस्थेची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना करायला पाहिजे, असा त्यांनी धोशा चालवला आहे.
 आकडेवारीचा धादांत असत्ये मांडण्यासाठी उपयोग करणे या कलेचा उगम हिटलटरशाही 'गोबेल्स'ने केला, स्टॅलिन काळात या कलेचा 'सुवर्णकाळ आला. मनःपूर आकडे मांडावेत, सोयीस्कर तेवढेच आकडे द्यावेत, शक्यतो टक्केवारीत बोलावे, मूळ आकडे सांगूच नयेत. हे सर्व साम्यवाद्यांचे खास कसब ! त्यांच्या कसबाने जग कधी फसले नाही, फसले ते फक्त साम्यवादीच. कोंबडे झाकून ठेवले म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही. रशियातील सत्यस्थिती किती विदारक होती हे लपवण्याचा प्रयत्न निष्फळ झाला आणि सर्व व्यवस्थाच ढासळली; तरीही रशियन साम्यवाद्यांना ना उमज पडली, ना समज!
 केवळ प्रार्थनाच
 साम्यवादी हुकूमशाही परत आणू पाहणारे एका बाजूला, 'फॅसिस्ट' हुकूमशाहीचा झिरिनॉव्सकी भस्मासुर दुसऱ्या बाजूला. आधुनिक सुसंस्कुत लोकशाहीवादी रशियाच्या उदयाचा काळ वाटतो तितका जवळ नाही. रशियन जनतेने अनेक दुःखं भोगली, वर्षानुवर्षे सोसली. झारशाही पाहिली असीम क्रूर जमीनदारी पाहिली , स्टॅलिनच्या सामुदायिक कत्तली सहन केल्या, जर्मन आक्रमणाला तोंड दिले. अजून त्यांना काय काय सोसावे लागणार आहे, कोणास ठाऊक? त्या सर्व रशियन भावाबहिणींकरिता प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हाती काहीच नाही.

(१४ जानेवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / १९८