पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






खुलेपणाच्या विरोधात 'बॉम्बे क्लब'ची क्लृप्ती


 देशातील कारखानदारीने आपला एक नवा मंच तयार केला आहे. कारखानदारीचा सगळ्यांत मोठा गड्डा मुंबईत असल्यामुळे या मंचाचे 'बॉम्बे क्लब' असे नामाभिधान करण्यात आले आहे.

 कारखानदारांच्या अधिकृत संस्था, संघ, चेंबर्स आणि त्यांचे महासंघ यांनी आजपर्यंत आर्थिक सुधारणांच्या दिशेने शासनाने एक एक पाऊल टाकले म्हणून मुंबईपासून कोलकत्त्यापर्यंत सगळे कारखानदार 'वाहवा, वाहवा' म्हणत होते. "सरकारी बंधने संपली, आता बघाच आम्ही काय चमत्कार करून दाखवतो!" अशा थाटात ते गर्जना करीत होते; पण ही सगळी फुशारकी मोरोपंतांच्या शब्दांत...

'स्वपर बळाबळ नेणून
बालिश बहु बायकांत बडबडला!'
अशी आहे.

  परदेशी भांडवल प्रत्यक्ष हिंदुस्थानात प्रवेश करण्याआधीच मोठी कारखानदार मंडळी शरणागतीचे पांढरे झेंडे फडकावू लागली आहे. पहिली शरणागती भारतीय बहुराष्ट्रीय थंड शीतपेयांची कंपनी 'पार्ले' हिने दिली. लागोपाठ 'गोदरेज' कंपनीच्या साबण विभागानेही शरणागतीचा झेंडा फडकावला. परदेशी स्पर्धेशी टक्कर घेण्यापेक्षा त्यांच्याशी हातमिळवणी करण्यात शहाणपणा आहे असे खासगीत बहुसंख्य कारखानदार कबूलही करतात.
 सोयीपुरते स्वातंत्र्य

 भारतीय कारखानदार आपण मोठे उद्योजक असल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात 'नेहरू व्यवस्थे'तील कारखान्यांचे ते केवळ व्यवस्थापक आहेत. स्वतंत्र उद्योजक नाहीत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कारखानदारांना

अन्वयार्थ - एक / १८९