पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या मालाच्या प्रचंड आकाराच्या आकर्षक जाहिराती सारख्या झळकत असतात. चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय "चित्रातारकांच्या सौंदर्याचा साबण, त्यांच्या मृदू मुलायम त्वचेचे रहस्य....साबण" अशा जाहिराती वर्तमानपत्रांत गुळगुळीत कागदांच्या मासिकात, रेडिओवर, दूरदर्शनवर पाहाल तिकडे सतत झळकत असतात. एवढा खर्च करून हे कारखानदार वर भरमसाट फायदाही मिळवत असतात. हे काय गौडबंगाल आहे? कुटीरोद्योगांना त्यांच्या गचाळ साबणाचा धंदा सगळी सरकारी मदत घेऊनही फायद्याने करता येत नाही आणि सगळी वारेमाप उधळपट्टी करणारे कारखानदार फॅन्सी माल देतात आणि वर फायदाही कमवून जातात, हे त्यांना कसे काय जमते?
 चित्रतारकांच्या जाहिरातीचे रहस्य
 या रहस्यांचे उत्तर तंत्रज्ञानात आहे अशी माहिती एका तज्ञाने पुरवली. सोडा आणि तेल यांच्या मिश्रणाने साबण बनतो. कच्चा मालाच्या गुणवत्तेवर साबणाची गुणवत्ता अवलंबून असते; पण कारखानदारी प्रक्रियेत साबणाला रंग, सुगंध, आकार आणि गुळगुळीत कोरडेपणा देता येतो, त्यामुळे माल आकर्षक बनतो. एवढेच नव्हे तर तेल आणि सोडा यांच्या रासायनिक प्रक्रियेतून साबणाखेरीज जोड-उत्पादन म्हणून ग्लिसरिन काढता येते. कारखानदारांच्या साबणाची खर्चीक जाहिरात आणि त्यांचा फायदा याचे रहस्य ग्लिसरिनच्या जोड उत्पादनात आहे.
 वाळूचे तेल वर वाळूही
 साबणाचे आधुनिक कारखानदार तेलाच्या उत्पादनातही भाग घेतात. शेंगदाण्यातील बरेच तेल गावच्या तेलघाणीत फुकट जाते. तेलाच्या गिरणीतही बराच स्निग्धांश ढेपेत निघून जातो. आधुनिक तंत्रज्ञानात नायट्रोजन शेंगदाण्यात पुन्हा भरून बिनतेलाचा शेंगदाणा जसाच्या तसा पहिल्यासारखाच दिसणारा खारवण्यासाठी किंवा इतर चटपटीत पदार्थ तयार करण्यासाठी हाती येतो. हे तंत्रज्ञान वापरले नाही तर त्यात फायदा कुणाचा नाही? तेलघाणीवाल्यांचा नाही, गिरणीवाल्यांचा नाही आणि देशाचाही नाही.
 राष्ट्रीय नुकसान

 कारखान्यात ग्लिसरिन काढून घेतात, मग ग्रामोद्योगाच्या साबणाची जाहिरात 'ग्लिसरिनयुक्त साबण' म्हणून केली तर? ग्रामोद्योगाच्या साबणातील ग्लिसरिनमुळे त्वचा अधिक चांगली राहते. आरोग्य चांगले राहते, असे सागता आले तर? मालाची विक्री चांगली होईल. कारखानदारी साबणातून ग्लिसरिन काढून घेतलेले

अन्वयार्थ - एक / १८७