पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंमतही कारखानदारी साबणाच्या वडीच्या तुलनेने काही फारशी कमी नसते. वडिलांच्या निष्ठेपोटी कुटीरोद्योगाचा साबण वापरावा लागतो. यामुळे घरातली माणसे, विशेषतः तरुण मंडळी मोठी नाराज असतात. या साबणाने अंग स्वच्छ व्हायच्याऐवजी अंगावर किटण चढल्यासारखे वाटते अशी त्यांची तक्रार.
 जनआंदोलन म्हणून कारखानदारी साबणावर बहिष्कार घातला आणि गावात तयार होणाऱ्या साबणाला प्रोत्साहन दिले, तर या एका मोठ्या ग्रामोद्योगाला दिवस बरे येतील, त्याची भरभराट होईल. तेव्हा शहरी मालावर बहिष्कार टाकण्याचा कार्यक्रम साबणापासूनच सुरू करावा, असा सर्वच मंडळींचा आग्रह पडला.
 तोट्याचा धंदा
 शहरातला साबण म्हणून घ्यायचा नाही असे ठरले तरे गावातील स्नानाच्या आणि कपडे धुण्याच्या साबणाच्या सर्व गरजा ग्रामोद्योग पुरवू शकेल काय? हा पुढचा प्रश्न. त्या क्षेत्रातील अनुभवी मंडळी म्हणाली, की सध्याचे उत्पादन पुरे पडणार नाही; पण अजून पुष्कळ गावी हा साबणाच्या उत्पादनाचा धंदा चालू करता येईल; पण त्यासाठी भांडवल लागेल. हे भांडवल बँकांकडून मिळणे कठीण आहे. कारण साबणाला मिळणाऱ्या किमतीत उत्पादनाचा खर्च काही भरून येत नाही. त्यामुळे सध्यादेखील सरकारी अनुदानाने आणि मदतीनेच हा धंदा चालला आहे. धंद्यात फायदा नाही म्हटल्यावर बँकेकडून कर्ज मिळणार नाही आणि सध्याची उत्पादनक्षमता अगदी १० पटींनी वाढवायची म्हटली तर एवढी सरकारी मदत मिळायची काही शक्यता नाही.
 शहरी साबणावर बहिष्कार घालण्याच्या कार्यक्रमात पहिली अडचण, गावाला लागणाऱ्या साबणाची गरज कुटीरोद्योग पुरवू शकणार नाहीत. उत्पादनात तातडीने वाढ करणे शक्य नाही. कारण त्यासाठी लागणारे भांडवल मिळणार नाही. भांडवल मिळणार नाही, कारण धंदा तोट्यात आहे. आता या दुष्टचक्रातून सुटायचे कसे?
 कारखानदारी उधळपट्टी

 मग आणखी एक नवा प्रश्न निघाला. परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशी कारखानदार लक्स, हमामसारखे साबण तयार करतात. त्यांचा माल वेष्टनापासून रंगापर्यंत आणि सुगंधापासून फेसापर्यंत लोकांना जास्त आवडणारा, भावणारा असतो. गावागावातल्या छोट्या दुकानांतही त्यांच्या साबणाचा पुरवठा होत राहील अशी व्यापारी व्यवस्था बिनबोभाट, अव्याहतपणे चालू आहे. वर्तमानपत्रांत

अन्वयार्थ - एक / १८६