पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आधुनिक तंत्रज्ञान नाकारून कुणाचे भले होणार?


 "गावातली लक्ष्मी शहरात जात आहे, गावातले उद्योगधंदे बंद पडत आहेत. गावे ओस पडत आहेत." ही आणि असली वाक्ये ग्रामीण समस्येविषयी बोलताना हरहमेश वापरली जातात. गावातील हुन्नरीची लूट म्हणजे गावची लूट, गावची लूट म्हणजे देशाची लूट; विलायती माल देशात आला, विलायती तोंडवळ्याचे कारखाने देशात उभे राहिले, त्यामुळे गावातील उद्योगधंदे मोडकळीस आले, बलुतेदार निर्वासित झाले, देश बुडाला इ. इ. शब्दांचे महापूर वाहिले आहेत.
 आधुनिक कारखानदारीसमोर ग्रामोद्योग हटले. त्यामुळे ग्रामोद्योगांचे, बलुतेदारांचे नुकसान झाले हे खरे; पण त्यामुळे देशाचे नुकसान झाले असे म्हणणे कठीण आहे. जो उद्योगधंदा अधिक कार्यक्षमतेने चालतो तोच शेवटी समाजाच्या हिताचा असतो.
 १९८४ मध्ये मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी सर्व सेवा संघाच्या सहकार्याने एक अभ्यास केला. गावकरी मंडळींनी शहरातला माल म्हणून घ्यायचा नाही, गांधीजींच्या आदर्शाप्रमाणे स्वयंभू, स्वयंपूर्ण गाव तयार करायचं असा निश्चय केला तर गाव पुन्हा संपन्न होईल काय? शहराविरुद्ध आर्थिक बहिष्काराचा कार्यक्रम चालवणे कितपत शक्य आहे? तो यशस्वी होईल काय? हे सारे तपासून पाहणे हा प्रयोगाचा हेतू होता.
 सुरुवात साबणाने

 सर्वसेवा संघ आणि ग्रामोद्योगाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था स्नानाचा साबण गावात तयार करून कित्येक वर्षे बाजारात ठेवत आहेत; पण बाजारात त्याला गिऱ्हाईक नाही. काही तत्त्वनिष्ठ मंडळी निष्ठा म्हणून कुटीराद्योगांच्या साबाणाच्या वड्या विकत घेतात आणि वापरतात. या साबणाच्या वड्यांची

अन्वयार्थ - एक / १८५