पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राबवायला सुरुवात झाली. आणखी दोनचार स्टेशने सुधारली; पण त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही.
 चंद्रावर पहिल्या उतरणाऱ्या अवकाशयानाचे आणि अवकाशवीरांचे कौतुक झाले. चंद्रावर आर्मस्ट्राँग पहिले पाऊल टाकत असता, ज्यांना ज्यांना शक्य आहे ती यच्ययावत माणसे डोळ्यात प्राण आणून टेलिव्हिजनच्या संचासमोर चिकटून बसली होती. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी लोकांचा उत्साह पार संपून गेला आणि त्या कार्यक्रमाकडे कोणी बघेना. स्टेशन सुधारणा ही हिंदुस्थानच्या हिशेबी चंद्रावर उतरण्यासारखीच नवलाईची गोष्ट! पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी कौतुक झाले. दुसरे-तिसरे स्टेशन सुशोभित झाले त्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही.
 खांबाचा 'हिरवेपणा'
 आणि मग एकदम चमत्कार झाला, अंधेरी स्टेशन सुधारले. प्रत्येक फलाटावरील खांब रंगवण्यात आले आणि इथेच कल्लोळ माजला.
 निर्णय कुणाचा होता कुणास ठाऊक? रेल्वे हे खाते केंद्र शासनाच्या अधिकारातील आहे. तेव्हा निर्णय कदाचित केंद्र शासनाचा असेल, पश्चिम रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा असेल, स्टेशनमास्तरांचा असेल किंवा ज्या खासगी कंपनीकडे शोभनाचे काम देण्यात आले, तिचा असेल. तेव्हा रेल्वेचे मंत्री जाफर शरीफ होते. बाकीची माणसे कोणच्या धर्माची आहेत हे ठाऊक नाही. निर्णय का, कसा? घेण्यात आला ते माहीत नाही; पण निर्णय घेतला गेला हे खरे!
 अंधेरी स्टेशनच्या नव्या खांबांना हिरवा रंग दिला गेला आणि इथेच सगळे बिघडले. हिरवा रंग म्हणजे मुसलमानांचा अशी समजूत असलेली शिवसेनेची काही टाळकी एकत्र आली, त्यांनी या रंगकामाला विरोध केला. रंगकाम नवीन असेल तरी ते बदलून दुसरा रंग वापरला गेला पाहिजे असा आग्रह धरला. सध्या मुंबईत पोलिसांपेक्षा शिवसेनेचेच राज्य चालू आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना काही पर्याय उरला नाही. निम्म्याअधिक खांबांचे रंग बदलण्यात आले, प्रत्येक खांबाचा निम्मा भाग वेगळ्या रंगाने रंगवण्यात आला आणि वाद मिटला.
 म्हणजे, अंधेरी स्टेशनापुरता मिटला. ही कदाचित देशभर पसरायच्या एका नव्या आंदोलनाची सुरुवात असू शकेल!
 आता 'हिरवा' बाद

 पॅरिसमध्ये फॅशनचे मोठे कौतुक असते. दरवर्षी हंगामात कपड्यांचे आकार, घाटणी, रंग बदलत राहतात. स्त्रियांचे कपडे कधी पायघोळ होऊन रस्ते झाडू

अन्वयार्थ - एक / १८१