पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






हिरव्याची हकालपट्टी


 मुंबईतील उपनगरी गाड्यांची स्थानके शोभिवंत करण्याचा कार्यक्रम धडाक्याने चालू आहे. अगदी पहिल्यांदा वांद्रा स्टेशन सुशोभित करण्यात आले. हिंदुस्थानातील रेल्वे स्टेशन म्हणजे घाणीचे आगर. स्टेशनच्या परिसरात गेले, की शौच, मूत्र आणि सडलेले अन्न यांच्या वासाचा भपकारा येतो. स्टेशनावरील स्वच्छतागृहांचा वापर फक्त ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा मिळवलेल्या योग्यांनाच जमणारी साधना आहे. टपाल कचेऱ्या, पोलिस ठाणी जशी गबाळीच असायची तशी रेल्वे स्टेशने घाणेरडी असायचीच ही भारताची 'प्राचीन' परंपरा आहे. पश्चिम रेल्वेतील कोण्या तल्लख बुद्धिमंत अधिकाऱ्याने ही परिस्थिती बदलवायचे ठरवले; पण त्याकरिता लागणारा पैसा आणायचा कोठून? रेल्वे खाते स्वच्छतेसाठी पैसा खर्च करायला तयार होईल हे शक्यच नाही.
 आजकाल खासगीकरणाचा मोठा जोर आहे. स्टेशन सुधारून ते साफ ठेवण्याचे काम खासगी कंत्राटदारांना द्यायचे आणि त्याबदली त्यांनी स्टेशनात उपलब्ध असलेल्या जाहिरातीच्या सर्व जागा वापरायच्या अशी योजना ठरली. वांद्रे स्टेशन सुधारले म्हणे! अशी सुधारणा माझ्यातरी नजरेत भरली नाही. एखाद्या म्हातारीने साजशृंगार करण्यासाठी सिगारेटच्या पाकिटातील चांदी गोळा करून तिचे नक्षीकाम प्रसाधन म्हणून अंगावर चिकटून घ्यावे असे काहीसे विचित्र स्वरूप स्टेशनच्या जुन्या इमारतीचे दिसले; पण कसे का होईना, पहिल्यापेक्षा स्टेशनाचे रुपडे बरे दिसत होते हे खरे!
 नव्याचे नऊ

 वर्तमानपत्रांनी नव्या उपक्रमाचे कौतुक केले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही या स्टेशनच्या नव्या रूपाचा कौतुकपर उल्लेख केला. रेल्वे खात्याचा हर भरून आला, उत्साहे वाढला आणि असाच कार्यक्रम इतर स्टेशनांवर

अन्वयार्थ - एक / १८०