पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 नव्या माणसाचा जन्म?
 प्रश्न समजला त्याला उत्तर काय? प्रसूतीच्या वेळी आईचे शरीर पाण्यात ठेवण्याचा एक प्रयोग गेली काही वर्षे मोठी प्रमाणावर चालू आहे. मूल पाण्यात जन्मते, नाळ तोडण्याआधी वीस वीस मिनिटे ते पाण्यात तरंगू शकते. पाण्यातून काढताना अनेकदा बाळे रडण्याऐवजी हसत असलेली दिसतात. पाण्याखाली जन्मलेली बाळे इतर मुलांच्या तुलनेने खूप झपाट्याने प्रगती करतात. तिसऱ्या चौथ्या महिन्यात बोलू लागतात, चालू लागतात. त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते. राग, द्वेष इत्यादी तामसी भावनांपासून ती पुष्कळ दूर राहतात. एवढेच नव्हे तर, गर्भकाळात मिळालेल्या अनुभवांचे त्यांना चांगले स्मरण असते. पाण्याखालील प्रसूती हा मानवजातीच्या उत्क्रांतीतील सर्वांत नवीन आणि सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे असा संबंधित शास्त्रज्ञांचा आग्रह आहे.
 नवे शतक - नवा माणूस
 मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीपासून जीवनसंघर्षात त्याने साधने आणि संघटना वापरली. मनुष्यप्राण्यात फारसा काही फरक पडला नाही. आता मनुष्यप्राण्याची प्रकृती, स्वभाव आणि सामर्थ्य बदलेल असे काही नवे घडत आहे. मार्क्स, गांधी यांनी समाजवादी 'विश्वस्त' अशा वेगळ्या बुद्धीच्या माणसांचा उदय समाजव्यवस्थेमुळे होईल अशी आशा धरली. सामाजिक परिस्थितीमुळे अधिक शुभंकर माणसाचा उदय झाला नाही. पाण्याखालील प्रसूतीसारख्या छोट्याशा गोष्टीने साऱ्या मनुष्यजातीचे परिवर्तन होण्याची शुभवार्ता शास्त्राने आणली आहे. विसाव्या शतकातून नव्या शतकात आणि नव्या सहस्रात जाणारा माणूस माणूस असेल, माकड नाही, ना राक्षस.

(६ जानेवारी १९९४)
■ ■

अन्वयार्थ – एक / १९