पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणले, असे संदेश केवळ दृकश्राव्य माध्यमातूनच नव्हे, तर गंध, रस, स्पर्श यांच्याद्वारेही देता येतात.
 मनुष्यप्राण्याची ज्ञानसंस्था केवळ पाच इंद्रिये आणि मेंदू नावाचे एक गणकयंत्र अशी ढोबळ नाही. त्यात अनेक, आजपर्यंत अज्ञात राहिलेले बारकावे आहेत, असे शास्त्रज्ञ मानतात आणि त्या दृष्टीने संशोधन करीत आहेत.
 फ्रेंच शास्त्रज्ञ अल्फ्रेड टोमॅटिस् यांनी एका मूकबधीर मुलावार मोठा अनोखा प्रयोग केला. मुलाच्या आईचा आवाज पातळ द्रव्याच्या माध्यमातून मुलाला ऐकवला. मुलाला हा सुप्त आवाज ऐकू आला. त्याने जाऊन खोलीभर अंधार केला आणि आईच्या मांडीवर जाऊन गर्भावस्थेतल्याप्रमाणे पायाशी डोके घेऊन तोंडात बोट घालून तो शांत पडून राहिला आणि थोड्या वेळात दहा महिन्यांच्या बालकाप्रमाणे चित्रविचित्र आवाज काढू लागला. बाळ गर्भात असताना आईचे बोलणे आणि आजुबाजूचे इतर आवाज गर्भजलाच्या माध्यमातून त्याला ऐकू येतात. त्यांच्या आठवणी जन्मानंतरही सुप्तावस्थेत राहतात
 ही कल्पना तशी नवी नाही, परंपरागत पद्धती आहे. आईचे खाणे, पिणे, वागणूक तसेच आसपासचे वातावरण यांचा गर्भावर परिणाम होतो, असे मानले जातेच. त्यामुळे, गरोदर स्त्रीची कोडकौतुके करावी, तिच्या मनाला धक्का बसू देऊ नये, अन्यथा बाळावर दुष्परिणाम होतात. याला मान्यता आहे. आजपर्यंत विज्ञानवादी तिला फारसे महत्त्व देत नसत; पण परिस्थिती बदलली आहे आणि अनेक ठिकाणी गर्भकाळातही मुलांना प्रशिक्षण देऊन 'सुपरमेन' तयार करण्याकरिता विद्यापीठे उघडली जात आहेत.
 जन्म म्हणजे दुःख
 गर्भकाळात मिळालेल्या साऱ्या संवेदना काही व्यक्तींच्या बाबतीत थोड्याफार तरी शिल्लक राहतात. सगळ्यांच्या बाबतीत असे का घडत नाही? गर्भवासाच्या सर्व स्मृती नष्ट का होतात? अनेक शास्त्रज्ञांचा आडाखा असा आहे, की उत्क्रांतीच्या काळात माणसाला मिळालेली प्रसूतीची पद्धत मोठी रानटी आहे. आईच्या पोटात सुखाने, कोणतीही चिंता न करता वाढणारे बाळ एकदम जगात फेकले जाते. जन्मत:च त्याला धक्का, भीती, भूक, राग इत्यादी भावनांचा परिचय होतो. गर्भकाळात मिळविलेल्या अनुभवांच्या आठवणी जन्माच्या त्या एका धक्क्यात पुष्कळशा पुसून जातात किंवा विस्कळीत होतात. गर्भवासातील अनुभव नष्ट होणार नाही. जन्मानंतरही ते ज्ञान कायम राहील अशी काही अवस्था झाली तर मानवांची एक अधिक उन्नत श्रेणी तयार होऊ शकेल.

अन्वयार्थ - एक / १८