पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधार काही नाही. फक्त कागदोपत्री फळबाग योजना निरोगी दिसावी याकरिता केलेला हा आकडेवारीचा खेळ होता.
 सारे कागदी खेळ
 फळबाग योजनेचे अर्थशास्त्र या विषयावर फलटणचे श्री. निमकर यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. त्यांच्या चर्चेतून जे निघाले ते थोडक्यात असे; ९०% कलमे जगतील असा हिशेब धरूनसुद्धा, फळांच्या पहिल्या हंगामापर्यंत होणारा भांडवली खर्च आणि त्यानंतरचा चालू खर्च भरून येण्याची काहीही शक्यता कागदावर उमटेना. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून व्याजाचा दर ६%, अगदी ३% इतका कमी धरूनसुद्धा फळबाग योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही हे स्पष्ट होत होते आणि तरीही मुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून फळबाग योजना पुढे रेटली.
 या भूकंपाचे पाप?
 महत्त्वाची तीन वर्षे गेली. या तीन वर्षांत फळबाग वाढीसाठी कितीतरी चांगली कामे करता आली असती. तीन वर्षांत झाला फक्त भ्रष्टाचार. लक्षावधी शेतकरी फळबाग योजनेच्या बोजवाऱ्यामुळे संकटात सापडणार आहेत. त्यांची जमीन अडकून राहिली, कलमे न जगल्यामुळे त्यांच्यामागे सरकारी वसुलीचा तगादा लागेल. फळबाग योजनेचा बोजवारा आणि फळबागेतील 'बोफोर्स' हा सर्व महाराष्ट्राला बसलेला भूकंपाचा आणखी एक धक्का आहे आणि त्याची थोडीशीही जबाबदारी भूमातेकडे किंवा परमेश्वराकडे ढकलता येणार नाही. योजनेचे डिंडिम वाजवून स्वत:कडे खोटे श्रेय ओढून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे हे वैयक्तिक पाप आहे, त्याचा त्यांनी झाडा दिला पाहिजे.

(०९ डिसेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १७९