पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शत्रूच्या स्वाधीन व्हावे अशा अटींवर किल्ला खाली करून दिला जाई. किल्ल्याच्या वेढ्याचा असा खेळ सतत चाले. रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा १० महिने पडला होता. सिद्दीच्या जंजीऱ्याला जिंकण्याकरिता खुद्द शिवाजीराजांनी तीन प्रयत्न केले. तिसऱ्या वेळचा वेढा तर किती दीर्घकाळ चालला, की त्याची मोठी विनोदी आख्यायिका सांगतात. वेढ्याच्या सुरुवातीच्या काळात मराठी लष्कराने चोखून फेकून दिलेल्या आंब्याच्या कोयी रुजून त्यांचे वृक्ष झाले, मोहोर आला, रसदार आंबे आले आणि ते आंबे चोखून खात खात मराठ्यांनी वेढा पुढे चालवला!
 हजरतबाल दर्ग्याला वेढा घालून बसलेल्या लष्कराला इतर अडचणी कितीही असोत, १०-१५ वर्षांनंतर त्यांना सफरचंदाच्या पुरवठ्याची चिंता पडू नये. त्यांच्या सध्याच्या रेशनमधल्या सफरचंदाच्या बियातून उत्पन्न झालेल्या बागांची फळे तोपर्यंत त्यांना मिळू लागतीलच!
 १९६७ मध्ये सुरू झालेल्या जंजिऱ्याच्या तिसऱ्या वेढ्याचे पुढे काय झाले? वेढा वर्षानुवर्षे चालला. शेवटी एका होळीच्या रात्री मराठी सैन्यात गाफीलपणा आला आहे, हे पाहून फत्तेखान सिद्दीने मराठ्यांच्या तळावर निकराचा हल्ला केला आणि दारूगोळ्याला आग लावून दिली. त्याचा स्फोट इतका गगनभेदी होता, की तो आवाज रायगडावर शिवाजी महाराजांना झोपेतही ऐकू गेला असे म्हणतात. हजारो मराठी लष्कर मेले, वेढा उठवावा लागला. सिद्दीविरुद्धच्या शिवरायांच्या तिसऱ्या मोहिमेचा असा निकाल लागला. सुवर्ण मंदिर, अयोध्या आणि त्यानंतरच्या या तिसऱ्या हजरतबाल दर्ग्यांच्या लढाईत पंतप्रधानांची झोपमोड अशीच होण्याची शक्यता कोण नाकारेल?
 आता नवा गझनीचा महंमूद
 तात्पर्य काय? देवळे त्यांच्या मूळच्या ऐतिहासिक कामगिरीकडे हजारो वर्षांच्या कालावधीनंतर परत आली आहेत. चोरचिलटे, दरोडेखोर, लुटारू, हल्लेखोर यांच्यापासून सुरक्षित ठेवायचे धन जडजवाहीर देवळात ठेवायचे म्हणजे देवाच्या धाकाने ते सुरक्षित राही एवढाच काय तो फरक!
 देवळाच्या वेढ्याचा हा तिढा सुटायला आता नवा गझनीचा महमूद पुन्हा अवतार घेण्याची वाट पाहावी लागणार!

(२५ नोव्हेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १७४