पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दर्यात अडकलेले अतिरेकी आठवड्याभरात सहज घायकुतीला आले असते. दाणागोटा संपला, पाणी संपले, औषध संपले म्हणजे पांढरे निशाण फडकवण्याखेरीज काही गत्यंतर राहत नाही; पण खुद्द जम्मू आणि काश्मीर न्यायालयानेच अतिरेक्यांना दाणागोटा पुरवणे ही लष्कराची जबाबदारी असल्याचा निर्णय दिला आणि भारतातील धर्मयुद्धाची परंपरा महाभारत काळानंतर पहिल्यांदा उच्च पराकोटीवर नेऊन ठेवली. वेढा घालून बसलेल्या जवानांना भाकरी मिळाली नाही तरी चालेल; पण वेढ्यात अडकलेल्या अतिरेक्यांना मात्र जेवण पोचलेच पाहिजे. अयोध्या प्रकरणापासून राजकीय निर्णय कोर्टावर ढकलण्याचा पंतप्रधानांचा डाव इथे त्यांच्या अंगलट आला. बाहेरून अन्नपाणी, औषधोपचार, वैद्यकीय सेवा इ. चा पुरवठा नियमितपणे चालू राहिला. मग विंचवाला पिंडीवरून उतरण्याचे कामच काय? त्यांच्या काही तक्रारी आहेत, "जेवण योग्य तसे काश्मिरी पद्धतीचे नसते, कालची बिर्याणी जरा सपक झाली होती आणि रुमाली रोटी पंजाबी पद्धतीची जाडीभरडी होती. काश्मिरी पद्धतीची मऊसूत मुलायम नव्हती." अशा तक्रारी राहणारच. कुटुंबापासून, मित्रमैत्रिणीपासून दूर राहावे लागणे हेही एक अतिरेक्यांचे दुःख आहेच. कोर्टामार्फत निर्णय आणून अतिरेकी असले प्रश्न सोडवून घेतील. नेहरूंनी मान्य केलेली काश्मीरमधील युद्धबंदी रेषाच पक्की झाली. त्याचप्रमाणे काही वर्षांत नरसिंह राव शैलीचा वेढा काश्मीरमधील एक प्रेक्षणीय स्थळ होऊन जाईल आणि कदाचित हा वेढा पाहण्याकरिताच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गर्दी उसळेल! काय सांगावे कदाचित त्यामुळे सगळ्या देशाचा परकीय चलनाचा चणचणीचा प्रश्न सुटून जाईल!
 किल्ल्यांच्या वेळांचे राजकारण

 कोणत्याही देवळाच्या भिंती बांधकामात तकलादू असल्या तरी दुर्गांच्या आणि किल्ल्यांच्या तटबुरुजापेक्षा जास्त मजबूत ठरतात, कारण त्यांना हात लावण्याची कोणाची शहामत नाही. किल्ल्यांना वेढा घालणारे तटबंदीवर तोफांचा भडीमार करीत, सुरुंग लावीत आणि काही जमले नाही तर शेवटी किल्ल्यात फंदफितुरी माजवीत. कोणी 'सूर्याजी पिसाळ' हाताशी धरायचा. त्याच्याकडून दरवाजे उघडून घ्यायचे किंवा देविगिरीच्या वेढ्यातल्याप्रमाणे, फितुरांकडून अन्नधान्याऐवजी कोठारात मिठाची पोती भरवायची अशा काही युक्त्या प्रयुक्त्या, धाडस करून किल्ला जिंकला जात असे. सगळ्या इतिहासकाळात किल्ल्यांचा वेढा हे मोठे खेळीमेळीने चालायचे प्रकरण असायचे. शिबंदीतील रसद संपायची चिन्हे दिसू लागली, की वेढ्याच्या कामाने कंटाळलेल्या शत्रूशी बोलणी सुरू व्हायची आणि किल्ल्यावरील लोकांना जिवंत जाऊ द्यावे किंवा येसूबाईप्रमाणे

अन्वयार्थ - एक / १७३