पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे त्या वेळी बोलले जात होते. राजकीय प्रश्न मिटला आणि पैगंबरांचा केस जितक्या अद्भुतपणे अदृश्य झाला तितक्याच चमत्काराने परत साकार झाला. एवढेच नव्हे तर जाणकार मल्ला मौलवींनी, "हाच तो प्रेषित महंमदाचा केस" अशी विश्वासपूर्वक ओळख पटवून घेऊन, निर्वाळा दिला. ३० वर्षांनी पुन्हा एकदा हजरतबाल दर्ग्याचेच प्रकरण पेटले. आजूबाजूच्या विद्यापीठात लपलेल्या अतिरेक्यांचा लष्कराने पिच्छा केला. त्या वेळी अतिरेकी दर्ग्यात घुसतील असा धोका आहे. त्यांना दर्ग्यात आसरा घेता येऊ नये अशी काळजी घेणे आवश्यक होते; पण लष्कराने तरी काय काय गोष्टीची चिंता करावी? त्यांना काय थोडी कामे आहेत? एकाच वेळी लष्करी कारवाई आणि लोकांची दिलजमाई असा चमत्कार घडवून पंतप्रधानपदावर आरूढ झाल्याची स्वप्ने पाहणारे, आपण जणू मोशे दायान आणि महात्मा गांधी यांचा संयुक्त अवतारच अशा थाटात वावरणारे राजेश पायलट! त्यांची दर दोन दिवसांआड काश्मीर भेट ठरलेली. आल्यासारखे त्यांची निदान एकतरी सभा व्हायला पाहिजे. सभा म्हटली, की माणसे जमवायला पाहिजेत. दूरदर्शनवचे कॅमेरे पाहिजेत. सगळी व्यवस्था करायची ती लष्कराने.
 गृहमंत्री शंकरराव चव्हाण विमानाने श्रीनगरला आले; पण राजधानीपर्यंत ६ कि. मी. अंतरावर मोटारगाडीने जाण्याची त्यांची हिमत झाली नाही. त्यांनी हेलिकॉप्टरचा आग्रह धरला, "या अतिरेक्यांचा काय भरवसा सांगावा? ते लांबून रॉकेटचा मारा करून गाडी उडवून देतील." ही त्यांची भीती!
 असल्या कामाच्या व्यापात लष्कराकडून अनवधान झाले. लष्कर उंदराला पकडायला निघाले. दरवाजे खिडक्या बंद केल्या. फक्त उंदराचे बीळ बंद करायचे राहिले आणि उंदीर सटकला. विंचवाचेच रूपक चालू ठेवायचे म्हणजे, विंचू अशी काही शहाजोग चलाखी करेल अशी कल्पना लष्कराला आली नाही आणि विंचू निर्धास्तपणे पिंडीवर चढून बसला.
 विंचवांना दाणागोटा पुरवा
 सुवर्ण मंदिरातल्या अकाल तख्तात रसद आणि शस्त्रे बिनधास्त येत राहिली. त्यामुळे भिंद्रानवाल्यांच्या साथीदारांना तख्त सोडून बाहेर पडण्याची काही गरजच नव्हती. दररोज देशोदेशीचे बामीदार टेलिव्हिजनवाले आत येत होते. भिंद्रानवालेंच्या मग्रुर अरेरावीला जगभर प्रसिद्धी देत होते. सुवर्ण मंदिराचा वेढा अजागळपणे वर्षानुवर्षे चालला तो थेट, 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'पर्यंत.

 अयोध्येत आणि आसपास तर सारे राज्य विंचवांचेच! त्यांना कसल्याच पुराव्याची कसलीच चिंता करण्याचे काही कारणच नव्हते.

अन्वयार्थ - एक / १७२