पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणजे डोळ्यासमोर मोठा विंचू बसला आहे, विंचू पाहिला, की पायातली वहाण काढायची आणि त्याला हाणायचे पण विंचू शंकराच्या पिंडीवर बसलेला, त्याला मारायला जावे तर पिंडीला चप्पल लागते! तस्मात विंचू आपणहून पिंडीवरून उतरून खाली येण्याची वाट पाहण्याखेरीज गत्यंतर नाही. ती एकदा उतरला, की मग पायातली वहाण त्याचा माज उतरवेल. तोपर्यंत विंचू पिंडीवर निर्धास्त सुरक्षित राहणार एवढेच नव्हे तर पिंडीबरोबर विंचवाचीही षोडशोपचारे पूजा होत राहणार.
 आधुनिक विंचू
 अलीकडेच विंचू खूपच हुशार झाले आहेत. शंकराची पिंड सोडून खाली उतरण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. उलट पिंडीवरतीच आपली वस्ती कायम पक्की करण्याचा त्यांचा खटाटोप आहे. एरवी दगडाच्या तळाशी राहणारा हा प्राणी दगडाच्याच लिंगाच्या माथ्यावर बसला, की मोठा माज दाखवू लागतो.
 अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा भिद्रानवालेंनी ताबा घेतला. सर्रास अन्नधान्य, इतर रसद, बंदुका, स्वयंचलित रायफली, रॉकेट्स अगदी आधुनिकातील आधुनिक शस्त्रे अतिरेक्यांना बिनधास्त पोचू लागली. दिवसाढवळ्या एका पोलिस उच्चाधिकाऱ्याचा त्यांनी खून केला. अमानुष छळामुळे विद्रूप झालेली प्रेते सुवर्ण मंदिराच्या बाहेर पडत असलेली हरहमशा दिसत होती; पण सरकार चालढकल करत राहिले आणि शेवटी एकदा, प्रार्थनास्थळाचे पावित्र्य भंगू नये अशा तऱ्हेने म्हणजे पायातील वहाणेने नव्हे तर चांगल्या जाडजूड दंडुक्याने विचवाला हाणावे लागलेच. पिंड वहाणेने विटाळली नाही, दंडुक्याने भंगली.
 अयोध्या प्रकरणी तर चालढकलीची कमाल झाली. तिथल्या प्रस्तावित देवळात खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचा जीव अडकलेला. त्यामुळे मशीद पडणार हे स्पष्ट दिसत असताना शासन निष्क्रिय राहिले. अयोध्येचा विंचू इतका माजोरी, की त्याने पिंडच फोडून टाकली. उंटावरील शहाण्याच्या कहाणीप्रमाणे दोन्ही प्रकरणात उंटही गेला, वेसही गेली आणि मडकेही गेले.
 केसाने गळा कापला

 गुरुद्वारा झाले, मंदिर झाले आता पाळी मशीदाची! काश्मीरचा हजतबालचा दर्गा मोठा इतिहासप्रसिद्ध. काश्मीरच्या राजकारणाच्या पटातील एक महत्त्वाचे घर. १९६३ मध्ये दर्ग्यातला हजरत पैगंबरांचा केस चोरीला गेल्याची बातमी पसरली. प्रत्यक्षात तो केस बराच काळ आधी नाहीसा झाला होता; पण चोरीचा मामला, शेख अब्दुल्लांनी राजकारणाच्या सोयीसाठी तारीख शोधून काढली

अन्वयार्थ - एक / १७१