पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



देवळांच्या विढ्याचा तिढा


 मृसरचे सुवर्ण मंदिर, अयोध्येचे मस्जिद-मंदिर आणि आता श्रीनगरचा हजरतबाल दर्गा, तीन देवळे, तीन धर्मांची; पण अलीकडच्या राजकारणाच्या रंगभूमीवर प्रकाशझोतात तळपणारी. सुवर्ण मंदिर प्रकरणामुळे एका पंतप्रधानांची हत्या झाली. अयोध्या प्रकरणामुळे निदान एक सरकार पडले आणि हजरतबालमुळे नरसिंह राव शासनाचे भवितव्य एका केसाच्या आधाराने टांगून राहिले.
 राजनीती देवळांभोवती प्रदक्षिणा घालते आहे. देऊळ पाहिले, की सत्ताधारी विस्तव पाहिल्यावर विंचवाने नांगी टाकावी तसे निष्प्रभ होतात. देवळांचा आश्रय घेणारे गुंड असोत, अतिरेकी असोत, देशद्रोही असोत, देवळात जाऊन त्यांचा पिच्छा करण्याची हिमत सत्ताधाऱ्यांची होत नाही. लहान मुले छापापाणी खेळतात, डाव असलेल्या गड्याने बाकीच्या गड्यांना ते उभे असताना पकडायचे असा खेळ असतो. शिवणारा जवळ आला, की खेळाडू गपकन खाली बसून घेतो. मग शिवणाऱ्याची काही मात्रा चालत नाही. भोज्याला जाऊन शिवले की डाव अंगावर येत नाही तशी देवळे अतिरेक्यांची भोज्ये बनले आहेत. काहीही उद्रेक करावा, माणसांचे मुडदे पाडावे, लुटालूट करावी आणि खुशाल एक चांगलेसे ऐतिहासिक देऊळ गाठून त्याचा आसरा घ्यावा. म्हणजे पाठलाग करणारे पोलिस किंवा लष्कर निष्प्रभ होऊन बावळटासारखे तोंड वासून चिडीचूप बसून जातात. पाठलाग करणाऱ्यांची स्थिती विस्तव पाहिलेल्या विंचवाची, तर अतिरेक्यांची स्थिती तर अक्षरशः शंकराच्या पिंडीवर चढून बसलेल्या विंचवासारखी.

 कवि वचनच आहेः

सांबाच्या पिंडीते बसशी
अधिष्ठून वृश्चिका! आज!
परि तो आश्रय सुटता
खेटर उतरवील रे तुझा माज!!

अन्वयार्थ - एक / १७०