पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आचार्य विनोबा भावे यांनी हिंदू शब्दाची व्याख्या करताना 'हिंदू वेदांना मानणारा असावा' ही महत्त्वाची अट घातली. उपनिषदांना मानणारांना किंवा वेदोपनिषदांना मानणारांना असे म्हटले नाही. वेद आणि वेदान्त यातील स्पष्ट विरोध आचार्यांना मान्य होता हे उघड आहे. 'वेदोपनिषद' असा समास सर्रास वापरला जातो; पण हा समास 'रामलक्ष्मण' या जातीचा नाही, 'रामरावण' या प्रकारचा आहे. वेदातील विचार आणि वेदान्त तत्त्वज्ञान यांतील फरक आणि विरोध याबद्दल चिडीचूप मौन बाळगण्याचे एक व्यापक कारस्थान शतकानुशतके चालत आले आहे.
 वेदान्ताची वाढती मान्यता
 वेदान्त तत्त्वज्ञानाची मान्यता वाढत आहे. आधुनिक विज्ञान, विशेषतः क्वांटम (Quantum) सिद्धांत आणि त्यानंतरचे संशोधन वेदान्ताची पुष्टी करणारे आहे. सकल विश्वाच्या स्वरूपाचे आकलन सांगणारे तत्त्वज्ञान म्हणून उपनिषदांची मान्यता आहे. याउलट वेदांचे स्थान आर्य समाजाच्या एका विशिष्ट अवस्थेत संपत्ती, आरोग्य, संतती इत्यादी फले प्राप्त करून घेण्यासंबंधीचा विचार एवढे मर्यादित मानले पाहिजे.
 वेदान्त विचाराची पुष्टी वेगवेगळ्या क्षेत्रांत अनपेक्षितपणे होत आहे. सर्वसामान्य माणसांना दूरवरचे दिसत नाही, त्यांना आपले हित कळत नाही, त्यामुळे अवघे जन मोठ्या संकटात आणि दुःखात सापडलेले असतात असा टाहो बहुतेक सर्व समाजसुधरीणांनी फोडला. संसार - दुःखातून लोकांची मुक्तता करावी, त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवावा म्हणून धर्मक्षेत्रात अनेक अवतार, प्रेषित, बाबा आणि महाराज झाले. सर्व विश्वाचा निर्माता आणि पालक जो परमेश्वर त्याच्यात आणि सामान्य माणसात संबंध जुळवून देणाऱ्या 'अडत्यांच्या वखारी' त्यांनी घातल्या. या वखारी आता राजकारणापुरत्या उपयोगाच्या राहिल्या आहेत. विश्वाची उत्पत्ती आणि चलनवलन यांचे गूढ उलगडण्यासाठी धर्मवाद्यांकडे कोणी जात नाही. ती जबाबदारी आता विज्ञानाने घेतली आहे. धर्म विज्ञानाचे साधन राहिलेला नाही. तसेच नैतिकतेचेही नाही. धर्मशास्त्राने रूढ केलेली नीतिमत्ता निरर्थक झाली आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी मान राखणे ही नैतिकतेची नवी व्यक्तिनिष्ठ व्याख्या सर्वमान्य होते आहे.

 धर्मकारणात 'अडत्यांचा' पराभव झाला तसाच अर्थकारणातही झाला आहे. सामान्यजनांना आपले हित समजत नाही. स्वर्थासाठी ते धडपडतात; त्यांची धडपड परस्पर विरोधी असते. त्यामुळे एकूण समाजाचे नुकसान होते, ते

अन्वयार्थ - एक / १६८