पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे पार्थ! (कर्मकांडात्मक) वेदांतील (फलश्रुतीच्या) वाक्यांना भुललेले व त्याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे मूढ (जे) लोक फुलवून असे भाषण करतात, की - २.४२ हे अर्जुना! (कर्मकांडात्मक) वेद (अशा रीतीने) त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले असल्यामुळे तू निस्वैगुण्य म्हणजे त्रिगुणातील, नित्य, सत्त्वस्थ, सुखदुःखादी द्वंद्वापासूनच अलिप्त आणि योगक्षेमादि स्वार्थात न गढता आत्मनिष्ठ हो - २.४२ चोहोकडे पाण्याचा पूरच झाला असता विहिरीला जितका अर्थ किंवा प्रयोजन राहते (अर्थात काहीच काम राहत नाही) तितकेच ज्ञान प्राप्त झालेल्या ब्राह्मणला सर्व (कर्मकांडात्मक) वेदांचे प्रयोजन असते (म्हणजे नुसत्या काम्यकम्यकर्मरूपी वैदिक कर्मकांडाची त्याला अपेक्षा राहत नाही.)
 - (नाना प्रकारच्या) वेदवाक्यांनी गांगरून गेलेली तुझी बुद्धी जेव्हा समाधिवृत्तीत स्थिर व निश्चिंत होईल, तेव्हा (हा साम्यबुद्धिरूप) योग तुला प्राप्त होईल २.५३.
 श्रीमद् भगवद गीता ब्रह्मविद्येच्या योगशास्त्रातील कृष्णार्जुन संवादाच्या रूपाने सांगितलेले उपनिषद आहे. उपनिषदात वेदांचा धिक्कार असेलच कसा? असा वाद राजकारणी हिंदुत्ववादी घालतील. धर्मशास्त्रातील जाणकारांना त्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.
 रानावनात फिरणाऱ्या पशुपालन आणि शेतीवर जगणाऱ्या आर्य टोळ्यांचे वेद हे ग्रंथ आहेत. जीवन सुलभ करणाऱ्या निसर्गातील वेगवेगळ्या देवतांना प्रमुख विषय आहे. वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यात कर्मकांड सांगितले आहे. संघ, गण, राष्ट्र अशा समुदायांच्या श्रेष्टत्वाचे गुणगान वेदविचारात आहे.
 पिंडी तेच ब्रह्मांडी

 याउलट उपनिषदांची उत्पत्ती आर्यांची वस्ती हिंदुस्थानात स्थिरावल्यानंतर झाली आणि उपनिषदांच्या विचारांवर एतद्देशीय 'लोकायत' तत्त्वज्ञानाचा प्रभाव वेदांपेक्षा अधिक आहे. उपनिषदांत सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला वेदांत म्हणजे वेदांचा अंत करणारे किंवा वेद जेथे संपतात तेथे ज्याची सुरुवात होते ते, असे नाव आहे.
 अनंत विश्व ज्याने व्यापले आहे, ते अविनाशी आहे, ते सतत रूप बदलते; पण नष्ट होत नाही, हे वेदान्तातील तत्त्व आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे. 'अहं ब्रह्मोऽस्मि' म्हणजे कोणताही प्राणिमात्र आणि विश्व यांच्यातील अभिन्नता मानणारा हा विचार वेदान्ताचा पाया आहे.

अन्वयार्थ - एक / १६७