पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



वेदान्ताचे अर्थशास्त्र


 काही वर्षांपूर्वी 'हिंदू विकासाची गती' हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला होता. अगदी गलथान परिस्थितीतही ती वाढ होते - ३.५% च्या आसपास ती हिंदू विकासाची गती! या गतीचा आणि हिंदुस्थानचा तसा काही संबंध नाही.
 आजकाल हिंदू अर्थशास्त्राबद्दल ऐकू येते. देवळापलीकडे आपल्याला काही समजते हे दाखवण्यासाठी भाजप नेते काही अडगळीत पडलेल्या अर्थशास्त्रज्ञांकडून 'हिंदू अर्थशास्त्र' या विषयावर चोपडी लिहवून घेत आहेत. जन्माने हिंदुत्व आणि केवळ मास्तरकीच्या अधिकाराने अर्थशास्त्र एवढ्या भांडवलावर अर्धा डझन विद्वान 'हिंदू अर्थशास्त्रज्ञ' बनले आहेत. दक्षिणा देईल त्याचा जयजयकार करण्याच्या ब्राह्मणी परंपरेत हे ठीक बसते.
 हिंदू अर्थशास्त्रातील चोपड्यात वेदांतील अवतरणे, चार्वाकाच्या अर्थशास्त्रातील संदर्भ यांच्या भरताडाखेरीज काही सिद्धांत औषधालाही सापडत नाही. हिंदू अर्थशास्त्राचा सैद्धांतिक आधार वेद का उपनिषेद? या प्रश्नाचा निर्णय प्रथम व्हायला पाहिजे.
 कूपमंडुक वेद
 वेदांना मानणाऱ्या लोकांना कोणी 'मूढ' म्हटले किंवा वेदांची तुलना छोट्याशा आडाशी केली तर असे बोलणारा कोणी तरी हिंदुद्वेष्टा नीच मनुष्य असेल असा समज हिंदुत्वावाद्यांचा होईल आणि ते अशा लेखकाचा 'सलमान रश्दी' किंवा 'नसरीन' करता येईल की काय अशा प्रयत्नास लागतील.

 पण ही वचने कोणा धर्मद्वेष्ट्याची नाहीत; कोणा म्लेंच्छाची नाहीत, कोणा यवनाची नाहीत, ही अवतरणे सर्व हिंदू धर्मीयांना परमपूज्य असलेल्या श्रीमद् भगवद गीतेतील आहेत. विनाकारण वाद नको म्हणून गीतेतील संबंधित श्लोकांची लोकमान्य टिळकांनी केलेली भाषांतरे खाली देत आहे.

अन्वयार्थ - एक / १६६