पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्या सारे महाराष्ट्र राज्यच आम्ही दत्तक घेतो आणि सगळे काही नमुनेदार पद्धतीने चालवून दाखवतो असा कोणी प्रस्ताव आणला तर तो मान्य होईल काय? याच वेळी उत्तर प्रदेशात शिवसेनेने उमेदवार उभे करायचे ठरवले. त्यांचे उत्तर हिंदस्थानात काम शून्य; पण कार्यालये, जाहिराती, वाहतूक इत्यादींसाठी पैसा आणि साधनसामग्री काँग्रेस पक्षाकडूनच पुरवली जात आहे. त्याबद्दल सज्जड पुरावा आहे. लिंबाळा गावासंबंधीचा निर्णय हा एका 'पॅकेज डील'चा भाग असावा!
 सावधान! सावधान!!
 सरकारचा हा सारा खटाटोप कशासाठी चालू आहे? भूकंपग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईदाखल काही रक्कम दिली असती आणि त्यांना पाहिजे तिथे पाहिजे तसे घर बांधण्याची मुभा दिली असती तर बहुतेक शेतकऱ्यांनी नवे गावठाण वसवण्याऐवजी आपापल्या शेतीवाडीवर नवी घरे वसवली असती. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ते चांगले झाले असते; पण एवढ्या मोठ्या उलाढालीत आपला काहीच हिस्सा नसावा हे नेत्यांना कसे पटेल?
 उत्तर काशीखंड मूळ पवित्र तीर्थस्थानांचा प्रदेश. सद्भावनेने आलेल्या करुणेनही तेथे एवढा कल्लोळ माजवला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तर सर्व पुनर्वसन भामट्यांच्याच हाती! या प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांचे दुर्भाग्य नजीकच्या काळात संपण्याची काही लक्षणे नाहीत.

(१२ नोव्हेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १६५