पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



रोगापेक्षा औषध भयानक


 स्टिफन झ्वाइंगची 'करुणेपासून सावधान' ही मोठी गाजलेली कादंबरी आहे. अपंग नायिकेची शुश्रुषा करणारा नायक तिच्यात इतका गुंतून जातो, की आपण तिच्या प्रेमात पडलो आहोत अशी त्याची भावना होते आणि नायकाच्या सेवाशुश्रूषेमुळे नायिकेचीच नायकावर संपूर्णतः अवलंबून राहण्याची मानसिकता बनते. दोघेही लग्न करतात; पण करुणेवर आधारलेले हे नाते थोड्याच काळात दोघांच्या मनात एकमेकांविषयी भयानक विद्वेष तयार करते, असे या कादंबरीचे कथानक आहे.
 पुण्यक्षेत्रात पाप
 उत्तर काशीत दोन वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला, ३० हजार घरं कोसळली आणि हजारावर लोक मृत्युमुखी पडले. भूकंपाच्या आपत्तीतून वाचलेली माणसे खंबीरपणे उभी राहिली. बाहेरून आलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता बाळगूनही आयुष्यात स्वत:च्या पायावर पुन्हा एकदा उभे राहण्याच्या खटाटोपास सारी माणसे लागली. हळूहळू उत्तर काशीकडे जाणारा रस्ता मोकळा झाला आणि मोठमोठे ट्रक भरून देशीविदेशी मदत येऊ लागली. वेगवेगळ्या देशीविदेशी संस्थांनी घरे पुन्हा बांधून देण्याचे काम अंगावर घेतले आणि सगळेच चित्र पालटून गेले.
 आज स्वीडनमधील गोरी माणसे तळपत्या उन्हात घामाने निथळत घरबांधणीचे काम करीत आहेत. ज्यांच्याकरिता घरे बांधली जायची ती मंडळी कोणीच हजर नाहीत. एखाद दुसरा हजर असल्यास शांत निर्विकारपणे विडी ओढत करुणेपोटी मेहनत करणाऱ्या लोकांकडे कुतूहलाने पाहत असतो. बांधकामासाठी किरकोळ मजूर लागले तर १०० रुपये रोजावर भरती करावे लागतात.

 बांधकामाचे काम फार मंद वेगाने चालू असल्याची तक्रार भूकंपग्रस्त करतात. घर बांधणी करणाऱ्यांशी ते त्यासाठी हमरीतुमरीवर येतात. उत्तर काशीत टाटांनी

अन्वयार्थ - एक / १६१