पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खर्च कमी करून आपले अंदाजपत्रक ठाकठीक करावे लागते.
 सरकारी अंदाजपत्रकाची स्थिती गृहिणीसारखी नसते; सरकारी खर्च पहिल्यांदा ठरतो आणि खर्च लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याची कोशीस सुरू होते. सरकारी अंदाजपत्रकाचे तंत्र असे उफराटे आहे. बायको बऱ्याच दिवसांकरिता माहेरी गेली असली म्हणजे नवरोबा जशी व्यवस्था चालवतो तसे हे तंत्र. खर्चाची मनमानी आणि पैशाची जुळवाजुळव, शिल्लक संपवणे, उधारी, उसनवारी इत्यादी कर बसवून मिळकत वाढवता आली नाही तर वित्तमंत्रीही लोकांकडून कर्जे घेणे, परदेशांतून मदत घेणे व सगळे मार्ग सरले, तर नोटा छापणे इत्यादी प्रकार अवलंबतात. बिचाऱ्या गृहिणीला असल्या शक्यता कधीच उपलब्ध नसतात.
 काटकसर हा गृहिणीचा सर्वांत मोठा गुण समजला जातो, तर बेहिशेब उधळलेपणा हा वित्तमंत्र्यांचा गुण. एखाद्या महिन्यात घरचे बजेट बिघडले आणि यजमानांकडून थोडे जास्त मागून प्यायची वेळ आली तर काय ऐकावे लागते आणि काय युक्त्या योजाव्या लागतात! वित्तमंत्र्यांना फारशी चिंता नसते. सरकारी खर्च वाढल्याने त्यांची लोकप्रियता वाढते आणि खर्चाची तोंडमिळवणी करण्याकरिता पुरेसे उत्पन्न मिळाले नाही, नवे कर लादले नाहीत तर दाट पडायच्या ऐवजी त्यांची वाहवाच होते.
 गृहिणीला तुटीचे अंदाजपत्रक करता येत नाही; केले तरी ते फारकाळ चालत नाही, त्यामुळे घर बर्बाद होते. देशाच्या बाबतीतही हे खरे आहे. अंदाजपत्रके लागोपाठ तुटीची असली आणि नोटा छापून खर्चाची मिळवणी झाली, की देश डबघाईला आलाच म्हणून समजा.
 उनाड पोरगा, चाबरा मास्तर

 पण खुर्चीवरला वित्तमंत्री इतका दूरवरचा विचार करणारा क्वचित असतो. राजकारणाची निकड अशी असते, की आला दिवस भागवून नेण्याकरिता त्याला खर्चही वाढवावा लागतो आणि वसुलीही कमी ठेवावी लागते. असला दुहेरी उधळेपणा हिंदुस्थानात वर्षानुवर्षे अनेक वित्तमंत्री चालवत आहेत. अंदाजपत्रकातील तुटीची रक्कम दरवर्षी भूमितीश्रेणीने वाढते आहे. त्यातून अर्थातच चलनवाढ, महागाई हे ब्रह्मराक्षस उभे राहतात; तर किमतीच्या वाढीमुळे देशातील उद्योजकांची परदेशांत माल खपण्याची शक्ती कमी होते, रुपयाची किमत घसरते आणि सगळ्या देशावरच आर्थिक अरिष्ट येते. हिंदुस्थानची स्थिती नेमकी हीच झाली आहे. उनाड मुलगा होस्टेलवर ठेवला आणि गुरुजी व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेतल्यासारखे चाबरट असले म्हणजे पास काय, नापास काय सगळा आनंदच.

अन्वयार्थ - एक / १५७