पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

द्रौपदी काही एकदम भर दरबारात खेचली गेली नाही. पाच वर्षे एक एक क्षणाने तिच्या वस्त्रहरणाचे नाटक पुढे सरकत होते आणि तरीही आधुनिक पांडव उघड्या डोळ्यांनी सगळे काही पाहत राहिले.
 धर्मराज रावसाहेब
 काँग्रेस सरकार पांडव म्हणजे भाजपा, शिवसेना, बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हे सगळे कौरव असे रूपक ओघानेच आले. या कौरवानी ६ डिसेंबर १९९२ रोजी एक नाही दोन द्रौपद्यांचे वस्त्रहरण केले. मस्जिद पाडलीच; पण त्याबरोबर भारतीय संघराज्याच्या घटनेचेही वस्त्रहरण केले.
 रावसाहेब म्हणतात, "काँग्रेसी पांडव स्वस्थ राहिले कारण त्यांनी घटनेची मर्यादा होती. सरकार पांडव म्हणजे 'राव'साहेब धर्मराज हे उघडच आहे. आपण मोठे सत्यप्रिय, निष्कलंक चारित्र्याचे, सदा सत्यवचनी असा जो टेंभा मिरवायचा; पण प्रत्यक्षत कसोटीच्या प्रसंगी ज्याचे हीन चारित्र्य उघडे पडायचे तो धर्मराज. जुगारी, द्रौपदीच्या लालसेने कुंतीच्या अनवधानाने उच्चारलेल्या 'सगळ्यांनी वाटून घ्या' या आदेशाचा गैरफायदा घेणारा आणि प्रसंगी 'अश्वत्थामा मेला' असे मोठ्या आवाजात बोलून हळूच 'हत्ती' असे कुजबुजणारा धर्मराजा. 'राव'साहेब म्हणजे धर्मराज ही उपमा काही वाईट नाही. किंबहुना 'अश्वत्थामा मेला' यापेक्षा असत्य वचनात आपण अधिक प्रवीण आहोत हे रावसाहेबांनी सिद्ध केले आहे."
 घटनेची कोणती मर्यादा, कोणते कलम मशिदीचे रक्षण करण्यापासून त्यांना थांबवत होते? उलट मशिदीचे रक्षण करणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य होते. काय पडेल ती किमत देऊन त्यांनी आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे होते. ते पाडले नाही. उलट घटनेच्या मर्यादांमुळे आम्हाला काही करता आले नाही असा त्यांचा कांगावा चालू आहे. 'राव' साहेब धर्मराज शोभतात खरे!
 अर्जुन सिंग

 कौरव कोण ते ठरले. धर्मराज कोण हेही समजले. अर्जुनाची भूमिका अर्जुनसिंगांकडे जावी. केवळ नाव सारखे असल्यामुळे नाही. अर्जुनाचे द्रौपदीवरचे प्रेम यथायथाच होते, द्रौपदीच्या अपमानाने तो फारसा कधी क्षुब्ध झाला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा राजकीय उपयोग करून घेण्याचा अर्जुनसिंगाचा प्रयत्न आणि त्यात अर्जुनासारखे नव्हे तर बृहन्नडेसारखे त्यांनी दखवलेले शौर्य पाहता, अर्जुनसिंग अर्जुन ही उपमेय उपमानाची जोडी फारशी वाईट नाही. रावसाहेबांच्या धर्मराजला अर्जुनसिंगापेक्षा पराक्रमी अर्जुन कोठून मिळायचा?

अन्वयार्थ - एक । १५३