पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रामायण, महाभारतावर केवळ भाजपाचा हक्क आहे असे नाही. आपणही त्यासंबंधी बोलू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक वस्त्रहरणाचे रूपक वापरले असावे.
 "इतिहासाची पुनरावृत्ती होते, पहिल्या वेळी शोकांतिका म्हणून आणि दुसऱ्या वेळी प्रहसन म्हणून" असे मार्क्सचे वचन आहे. इतिहासातील कोणताही प्रसंग जसाच्या तसा पुन्हा घडत नाही. द्रौपदी वस्त्रहरण एका शोकांतिकेची नांदी होती. ६ डिसेंबरचा प्रसंग कदाचित शोकांतिका ठरेल; पण 'राव'साहेबांचे विधान मात्र विदुषकी प्रहसनासारखे आहे.
 असली रूपके फार ताणायची नसतात. ती सर्वतोपरी शंभर टक्के लागू पडतील अशी अपेक्षाही नसते; पण दिलेल्या उदाहरणात आणि प्रत्यक्ष प्रसंगात काही निदान साम्य असायला पाहिजे.
 ते महाभारत आणि हे महाभारत
 महाभारतात द्रौपदीला भर दरबारात विवस्त्र करण्यासाठी दुर्योधन, दुःशासन उठले. धृतराष्ट्र, गांधारी, द्रोण, भीष्म आदी गुरुजन आतंक पाहत राहिले. द्रौपदीने युक्तिवाद केला, "माझे पती दास झाले हाते, दासांना आपली पत्नी द्यूतात पणाला लावण्याचा अधिकारच नव्हता." तिच्या शास्त्रार्थाकडे कोणी लक्ष दिले नाही. दुर्योधनाने तिच्या वस्त्राला हात घातला, तिचे केस मोकळे केले; पण द्रौपदीचा धावा ऐकून श्रीकृष्णाने असा चमत्कार केला, की वस्त्र फिटता फिटेना... अशी महाभारतातील थोडक्यात कहाणी आहे. श्रीकृष्णाच्या हस्तक्षेपाचा भाग तत्कालीन सेन्सॉरने बळेच घुसवला असावा. श्रीकृष्ण खरोखरच मदतीला धावून आला असता तर कौरवांची तिथेच फजिती झाली असती आणि मग पुढचे सूडाचे महाभारत घडण्याचे काही कारणच नव्हते.
 श्रीकृष्ण गैरहजर
 अयोध्येतील द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कोणी श्रीकृष्ण धावून आला नाही. एवढेच नव्हे तर भर दरबारात पुरा बलात्कार झाला. खऱ्या महाभारतात श्रीकृष्ण मदतीला धावून आले नसते तर पांडव स्तब्ध बसून राहिले असते काय? या प्रश्नाचे उत्तर मोठे कठीण आहे. 'राव'साहेबांच्या रूपकात एवढा तरी फरक मान्य केला पाहिजे. काँग्रेसी पांडवांच्या पाठीशी कोणी कृष्ण उभा नव्हता.

 द्रौपदी वस्त्रहरणाचा दोष पांडवांकडे येतोच धर्मराजा जुगारी. केवळ जुगाराच्या कैफात सगळे हरून द्रौपदीला पणाला लावून तीही हरण्याइतकी धर्मराजाची बुद्धी झालेली. रावसाहेबांच्या रूपकातला हा एवढाच भाग खरा आहे. अयोध्येची

अन्वयार्थ - एक । १५२