पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






श्रीकृष्णाविना वस्त्रहरण


 "भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना पांडव स्तब्ध राहिले, तशीच आमची स्थिती अयोध्येत मस्जिद पाडण्यात आली त्या वेळी झाली. पांडवांप्रमाणे मर्यादेने आम्ही बांधले गेलो कारण आम्हाला घटनेचे रक्षण करायचे होते." इति प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंह राव लखनौ येथील निवडणूक प्रचाराच्या सभेत भाषण करताना!
 उत्तर भारतात भाषण करायचे म्हणजे रामायणाचा उल्लेख करत करत, तुलसी रामायणातील वचने उद्धृत करत करत करावे लागते, तरच ते लोकांना समजते. रामायण, महाभारताचा संदर्भ दिल्याखेरीज वक्ता खरे बोलतो आहे असे लोकांना वाटतच नाही. न. वि. गाडगीळ यांनी ४० वर्षांपूर्वी हा अनुभव घेतला. उत्तर भारतातील सभांचा अनुभव असलेल्यांना हे चांगले ठाऊक आहे. तेथे भाषणाला जायचे म्हणजे कट्टर डावेसुद्धा रामायण, महाभारतातील काही कथांशी, बादरायणी का होईना संबंध जोडतात; मग नरसिंह रावांनी महाभारताचा संदर्भ द्यावा यात आश्चर्य ते काय?
 महापंडित वदले

 लखनोच्या काँग्रेसच्या सभेचे वातावरणही उत्साहाने धुंद झाले होते. मुलायमसिंगांच्या मेळाव्यापेक्षा काँग्रेसचा मेळावा अधिक मोठा भरल्यामुळे काहीसा कैफ चढलेलाच होता. प्रधानमंत्री येणार म्हटल्यावर त्यांची भरमसाट स्तुती करण्याची काँगेसजनांची परंपरा आहे. ती स्तुती ऐकून घेण्याची, त्यामुळे खुष होण्याची आणि खुषमस्कऱ्यांना यथाकाल, यथोचित बक्षिसी देण्याची पंतप्रधानांची परंपरा आहे. 'राव'साहेबांचे स्वागत 'महापंडित' इत्यादी स्तुतिसुमनांनी झाले. त्यामुळे आपले पांडित्य दाखवण्याची जबाबदारी 'राव' साहेबांवर पडली; म्हणून कदाचित त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा उल्लेख केला असावा. कदाचित,

अन्वयार्थ - एक / १५१