पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाडीत, गर्द सावलीत निवांतपणे तणावून दिलेले सापडतील. कोणी चोरचिलटे घुसले तर त्याचा थांगपत्तासुद्धा पहिलवान पहारेकऱ्यांना लागणार नाही. सशस्त्र टोळीने उघडउघड हल्ला केला तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सामोरे जाण्याऐवजी मानवी पहारेकरी पळता पाय काढतील आणि स्वतःचा जीव वाचवतील. एवढ्यावरच भागले तरी पुरे; हल्लेखोर मानवी सुरक्षा अधिकाऱ्यांना फितवून त्यांच्या संगनमतानेच कारखान्यावर हल्ला करण्याची शक्यता नगण्य नाही,
 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संरक्षणासाठी 'काळी मांजरे' ठेवण्याऐवजी डॉबरमन कुत्रे ठेवले असते तर त्यांच्यापैकी कुणी 'बेअंतसिंग' झाला नसता आणि इंदिराजी आजही आपल्या असत्या. राजीव गांधींवर हल्ला झाला तेव्हा सुरक्षा पोलिसांची एकच धावपळ झाली. राजीवजींच्या सुरक्षेसाठी नाही, मारेकऱ्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठीही नाही तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी. सुरक्षा पोलिसांऐवजी कुत्रे असते तर असे कदापिही घडले नसते.
 महाराष्ट्रात पोलिसांच्या आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या जागी कुत्रे नेमले गेले असते, तर अरब देशातील स्फोटके बिनबोभाट उतरली नसती. कोणाही कुत्र्याने बेकायदेशीर स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला आपल्या देखरेखीखाली 'एस्कॉर्ट' देऊन आणले नसते, हे तर नक्कीच. असला नीचपणा कुत्र्याच्या जातीत संभवत नाही.
 सरकारी नोकरांचे शुनीकरण
 लार्सन टुब्रो कंपनीचे अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी देशाला एक नवीन दिशा दिली आहे. कंपनीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून केवळ सुरक्षा खात्यातच नव्हे तर सगळ्याच खात्यात नोकरांचे 'शुनीकरण' करणे देशाच्या मोठे हिताचे होणार आहे. कुत्री बिचारी त्यांना काय नाश्ता. जेवण असेल ते घेतील:पण त्यानंतर आणखी वरकमाई व्हावी यासाठी पंजा पुढे करणार नाहीत. म्हणजे, भ्रष्टाचाराला आपोआपच विराम मिळेल. एखादाच खोटा कुत्रा समोर टाकलेले किलो दोन किलो मटन स्वीकारण्याच्या मोहात पडेल; पण सुटकेस भरून कितीही नोटा आणल्या तर त्यात कोणाही कुत्र्याला स्वारस्य वाटणार नाही.

 शिक्षण संस्थात कितीतरी बेशिस्त माजली आहे. शिक्षक, प्राध्यापक, पर्यवेक्षक यांच्या जागी कुत्र्यांची नेमणूक केली – या जागी 'डॉबरमन'पेक्षा 'पामेरियन' कुत्र्यांची नेमणूक करावी लागेल - तर आठवड्याभरात रॅगिंग थांबेल, मुलींची

अन्वयार्थ - एक / १४८