पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेकांना मोठे दुःख वाटले.
 कुत्र्यांवर खर्च करण्याऐवजी भरभक्कम दांडगे पहिलवान नोकरीवर ठेवले असते तर त्यांच्या खुराकाची चांगली सोय झाली असती. एकट्या महाराष्ट्रातच कितीतरी होतकरू पहिलवान खेळाड़ योग्य खुराक नसल्यामुळे कसरत सोडून देतात. लार्सन टुब्रो कंपनीच्या कुत्र्यांच्या जागी या खेळाडूंची सोय झाली असती तर भारताचे नाव क्रीडाक्षेत्रात रोशन व्हायला मदत झाली असती, अशी अनेकांना हळहळ वाटते.
 देशात बेकारी किती माजली आहे! लक्षावधी नाही, कोट्यवधी तरुण बेकार आहेत. त्यात सुशिक्षितांचा, पदवीधरांचा भरणा हा मोठा आहे. बेकारी अशी माजलेली असताना माणसांनी करण्याजोग्या कामांसाठी कुत्र्यांची नेमणूक व्हावी याबद्दल भल्याभल्यांनी सात्त्विक संताप जाहीर केला आहे. 'कुत्र्याचे जिणे' माणसांना मिळावे म्हणून जोरदार मागणी केली आहे.
 कुत्र्यांमुळे रोजगारी घटेल?
 यंत्रे वापरून बेकारी वाढवू नका हा खूप जुना आर्थिक विचार आहे. यांत्रिकीकरण झाले, की माणसे बेकार होतात, संगणक वापरले, की माणसे बेकार होतात असा धोशा वेगवेगळ्या विचाराच्या नेत्यांनी आणि कामगार पुढाऱ्यांनी अखंडितपणे लावला आहे. महात्माजींचा यंत्राला विरोध नैतिक कारणांसाठी होता हे खरे; पण त्याबरोबर माणसांच्या हातांना काम मिळाले पाहिजे हीही भावना त्यामागे होती. सगळ्या विरोधाला तोंड देऊन यंत्रे येत राहिली, संगणक जागोजाग दिसू लागले; पण त्यामुळे नोकरदारांना रजा देऊन काढण्यात आले असे कुठे फारसे ऐकिवात नाही. नोकरदार मंडळी एकदा नेमली गेली, की जळवांप्रमाणे चिकटून राहतात. काम असो नसो, ते आपल्या पदांवर पक्के.
 यांत्रिकीकरण थांबवा, बेकारी हटवा ही घोषणा निरर्थक ठरली. आता कुत्र्यांना हटवा आणि माणसांना त्यांच्या जागी नेमा अशी मागणी सुरू झाली आहे; पण समजा, विद्वानांचा सल्ला ऐकून खरोखरच असे केले, कुत्र्यांच्या जागी माणसांना नेमले तर काय होईल?
 कुत्र्यांच्या जागी माणसे

 सुरक्षेसाठी नेमलेले पहिलवान कुत्र्यांइतकाच खुराक तर खातील; पण त्यानंतर कुत्र्यांप्रमाणे चोवीस तास जागृत राहून, कोठून हल्ला झाला तर प्राणपणाने कर्तव्य बजावण्यासाठी तुटून पडणार नाहीत. कारखान्यात कोणत्या तरी कोपऱ्यात,

अन्वयार्थ - एक / १४७