पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मजबूत झाले. पाच दहा मोठे उद्योजक हाताशी धरले आणि त्यांना लायसेंस, पटमीटचा मलिदा घातला, जनकल्याणाच्या घोषणा दिल्या, गरीबांचे भले करण्याचा आव आणला म्हणजे सगळे काही ठाकठीक चालते अशी पुढाऱ्यांची समजूत झाली. गरिबांचा कैवार आणि उद्योजकांची लूट अशी कामगिरी पुढाऱ्यांनी हाती घेतली.
 आमचा त्राता कोण?
 उद्योजक करणार काय? त्यांनी दुकान बंद केले तर त्यांना देशघातकी, साठेबाज इत्यादी शिव्या मिळणार; गुन्हेगार म्हणून अटक होणार, जाळपोळ करून ते उद्योजकाला आयुष्यातून उठवणार अशा भीतीने उद्योजक कधी दंड थोपटून उभे राहिले नाहीत. आपले जिणे हे असेच असायचे; सरकारी भ्रष्टाचार आपण निमूटपणे स्वीकारला पाहिजे; इन्स्पेक्टरांना लाच दिली पाहिजे; पुढाऱ्यांना बॅगा पोचवल्या पाहिजेत; हा सगळा आपला भोग आहे कारण आपण स्वतंत्र राहू इच्छितो, कुणाच्या नोकरीचे जू आपल्या खांद्यावर घेणे आपल्या स्वभावाला जमत नाही. स्वातंत्र्याची किंमत म्हणन हे सारे सहन केले पाहिजे अशी उद्योजकांची मानसिकता झाली. शतकानुशतकीचे दलित माणूस बनले, नवे उद्योजक नवे दलित बनले. पूर्वी दलितांना पोलिसांचा आणि कायद्याचा जाच असे. काही निमित्त असो नसो भटक्या टोळ्यांच्या मुक्कामी आणि गुन्हेगार मानलेल्या जमातीच्या तळावर पोलिसांची धाड कधीही पडे. त्याचप्रमाणे आता उद्योजकांच्या तळावर टॅक्सवाले, पुढारी, इन्स्पेक्टर पाहिजे तेव्हा धाड घालतात. हात मारून घेतात. ट्रकवाल्यांना तर कोणीही शिपुरड्याने थांबवावे आणि दक्षिणा गोळा करावी. या नव्या दलितांना कोणी त्राता नाही.
 शेषाचा रोष

 अेन रँड या अमेरिकन लेखिकेने उद्योजकांच्या संपाची कल्पना पहिल्यांदा पुढे मांडली. संशाधक, उद्योजक, उत्पादक हे खरे शेषाप्रमाणे पृथ्वी सांभाळून धरतात. याउलट फुकटे, भुरटे, पुढारी, राजकारणी, 'समाजहिता'च्या, 'गरिबांच्या सेवे'च्या घोषणा देत, पृथ्वीचा भार सहन करणाऱ्या या शेषालाच असह्य पराण्या मारत राहतात. लेखिकेच्या एका कादंबरीत एक उद्योजक उद्योजकांचे एक वेगळे भूमिगत राज्य तयार करतो. अमेरिकेतल्या साऱ्या कल्पक आणि कर्तबगार लोकांना तो हळूहळू आपल्या या राज्यात घेऊन जातो. परिणामतः शेषाने अंग काढून घेतल्यावर पृथ्वी डगमगू लागते.

अन्वयार्थ - एक / १४४