पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिल्या फेरीचा शिणवटा उतरलेला नसतो; आंदोलनाची दुसरी फेरी सुरू करायला कोणीही फारसे उत्सुक नसते. सरकारच्या डावपेचांचा मुंहतोड जवाब द्यायला लागणारे चैतन्य शिल्लक नसते. बहुतेक आंदोलने या पायरीला संपून जातात. काहीशी निराशा येते आणि मग पुन्हा एकदा रोषाची वाफ कोंडून विस्फोटक बनेपर्यंत सारे काही शांत होऊन जाते. वाहनचालकांचे आंदोलनाचे चाक पंक्चरले नाही, महिन्याभरात पुन्हा एकदा तडाखा देण्याची जी ताकद आणि कर्तबगारी आंदोलकांनी दाखवली त्याच्याबद्दल हे अभिनंदन आहे.
 ऐतखाऊंचे संप
 सगळे नोकरमाने संप करतात. ज्यांची खरोखरच हलाखीची परिस्थिती आहे असे असंघटित कामगार गावोगावी विखुरलेले आहेत. त्यांचे काही संप होत नाहीत. त्यांची बिचाऱ्यांची ताकदच नसते. संघटित कामगार वारंवार संप करतात. पायलट महिना ६५००० रु. रोख आणि इतर अनेक फायदे मिळवणारे बँक, विमा, कर्मचारी, भाग्यवान प्रध्यापक, शिक्षक हर मुहूर्ताला सोने खरेदी करणारे. संप करायचा तो पगारदारांनी. मग त्यांची पगारभत्त्यांची किती का लयलूट असेना! संपाच्या हत्याराची मक्तेदारी नोकरदारांची अशी कल्पना समाजवादी अमदानीत रूढ झाली होती. म्हणजे विमानचालक कामगार, प्राध्यापक, कामगार यांनी लाल झेंडा हाती घेऊन शोषणाच्या विरुद्ध आरोळ्या ठोकल्या, सगळे जनजीवन विस्कळीत करून टाकले तर चालेल; पण स्वयंरोजगार, पानाचा ठेलेवाला, वेल्डिंग किंवा मोटार दुरुस्तीचा धंदा चालवणारा, एखादी टेम्पो घेऊन महिना हजार दोन हजार रुपये कसेबसे कमवणारा यांना संप करण्याचा अधिकार नाही. कारण ते नोकर नाहीत, गरीब असले तरी मालक लोक आहेत.
 मालकांचेही संप

 शेतकऱ्यांनाही आपले दुःख पुढे मांडण्याचा काही रस्ता नाही. कारखानदारांची स्थिती तीच. यंत्रे आणि साधनसामग्री समाजवादी व्यवस्थेत भरमसाट किमत देऊन घेतलेली; जुन्यापान्या तंत्रज्ञानावर आधारलेली; जिकडे तिकडे लायसेंस-परमीट राज्य आणि इन्स्पेक्टरांची मनमानी. कामगारांची कुशलता काम टाळण्यात आणि चुकवण्यातच! धंदा डबघाईला आला, लक्षावधी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान दरवर्षी होऊ लागले तरी कारखानदार पूर्ण हतबल, यंत्रसामग्री बदलावी म्हणावे तरी सरकारी परवानगी नाही;

अन्वयार्थ - एक / १४२