पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धडा हा; बाळाला जग पाहू द्या, अनुभवू द्या. त्याला इजा होईल की काय? याची थोडीफार चिंता ठीक आहे; पण त्या चिंतेपोटी निरोगी बाळाला दुर्बळ बनवू नका आणि अपंग बाळाला आणखी अपंग बनवू नका.
 अर्थशास्त्र्यांना आईचा धडा
 आपला देश एक निरोगी बाळ आहे का? की सी. पी. बाळ आहे. या प्रश्नावर पुष्कळ वादंग घालता येईल. देश निसर्गतः संपन्न आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी; वेगवेगळे हवामान; मनुष्यबळ, एक दीर्घकालीन इतिहास... सगळे लाभलेला हा देश अपंग नाही, असेही म्हणता येईल. जाती, धर्म, भाषा, यांच्या भेदाभेदाने पिडलेला, शतकानुशतके वेगवेगळ्या आक्रमणांनी निर्बल झालेला; दारिद्र्यामुळे, निरक्षरतेमुळे, छित्रभिन्न झालेला असा आमचा देश एखाद्या सी. पी. बाळाप्रमाणे आहे असे कुणी म्हटले तर तेही फार चूक आहे असे म्हणता येणार नाही.
 आमचे बाळ अव्यंग आहे किंवा नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. बाळ कसेही असो. निसर्गाने त्याला दिलेले गुण आणि दोष लक्षात घेता त्याचा जास्तीत जास्त परिपोष करण्याचा मार्ग त्याचा सगळ्या बाकीच्या जगाशी संबंध येऊ देणे हा आहे. जगाशी देवघेव थांबवून, व्यापार थांबवून, उद्योगधंद्यांना संशोधकांना संरक्षण देण्याचे निमित्त करून तुम्ही या बाळाला बंद खोलीत ठेवले, जगाच्या मोकळ्या वाऱ्यापासून आणि अनुभवाच्या विविधतेतून, नवनव्या तंत्रज्ञानापासून, विचारापासून, संशोधनापासून बाळाला वेगळे ठेवले तर ते निरोगी असले तरी अपंग होते. स्वातंत्र्यांनंतरच्या ५० वर्षांचा अनुभव हाच आहे. आईची बुद्धी दुष्ट होती असे कसे म्हणावे? आईची इच्छा बाळाच्या भल्याचीच होती; पण प्रेमापोटी तिने बाळाला अपंग बनवले, अशी उदाहरणे वास्तवातही आपण अनेक पाहतो. एक सुज्ञ आई बाळाच्या भल्याकरिता जे करते त्याचे सूत्र आमच्या पुढाऱ्यांना आणि शासनकर्त्यांना समजले असते तर आजची अवस्था आली नसती. प्रभा घारपुरेंच्या 'साधना'तील एक आईच्या धडपडीच्या या साध्या गोष्टीत एवढा मोठा आशय दडलेला आहे.

(२४ सप्टेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १४०