पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाळ एक दिवस विश्वाला गवसणी घालणाऱ्या आईन्स्टाईनसारखे आणि चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या आर्मस्ट्राँगसारखे कसे बनते? बाळाचा विकास काही शिकवणीने होत नाही. दुपट्यात पडलेले बाळसुद्धा या जगात मी आलो आहे, मला हे जग समजून घ्यायचे आहे, हाताळायचे आहे अशा जिद्दीने हातपाय झाडीत असते. हाताच्या हालचालीची दिशा त्याला नेमकी ठरवता येत नाही. 'तान्ह्या बाळा तीट लावू' हे गाणे म्हणून बाळाला कपाळाच्या मध्यभागी तर्जनी न्यायला आईने शिकवले म्हणजे बाळाचा हात कधी टाळूवर तर कधी डाव्या-उजव्या कानापर्यंत जातो. समोर रंगीबेरंगी खेळणे ठेवले, की बाळ ते पकडू पाहते; जमत नाही; परत प्रयत्न करते आणि हातावर, पायावर, शरीराच्या सगळ्या अवयवांवर हळूहळू ताबा मिळवते. बोबड्या बोलण्यापासून ते लांबलचक वाक्यांपर्यंत फेक टाकण्याची प्रगती ते करू शकते. बाळाचा शिक्षक निसर्ग असतो. त्याला जितके फिरवावे, जग दाखवावे जितके ध्वनी; आवाज ऐकवावे, जितके स्पर्श अनुभवू द्यावेत, जितक्या चवींची रुची द्यावी, त्याच्याभोवती अनुभवांची जितकी संपन्नता तयार करावी तितकी बाळाची वाढ झपाट्याने होते.
 अपंगितांचा चालविता
 अव्यंग निरोगी बाळाच्या बाबतीत हे खरे आहे. जन्मजात व्यंग घेऊन आलेल्या बाळांना थोडेफार माणसाच्या बाळाप्रमाणे वाढायचे असेल तर इतर बाळांपेक्षा हजारोपट धडपड करावी लागते. समोर रंगीबेरंगी खेळणे ठेवले तर त्याला पकडण्याची कला इतर बाळांना दोन-चार दिवसांत साध्य होत असेल, तर दुर्दैवी सी. पी. बाळाला कदाचित सहा महिने, वर्ष लागेल. म्हणजे त्या बाळाला जग अधिक दाखवण्याची, वेगवेगळ्या गोष्टींची अधिक अनुभव, चव, गंध, स्पर्श याचा अनुभव देण्याची गरज असते. वेगवेगळे लोक पाहणे, बरोबरीच्या बाळाशी संबंध ठेवणे हे सी. पी. बाळाला इतर बाळांपेक्षाही आवश्यक असते आणि बाळाचे आईबाप त्यांच्या मनातील न्यूनगंडामुळे नेमकी ही अनुभवांची संपन्नताच त्याला नाकारतात. घरात पडून राहणारे, आईखेरीज दुसरा चेहरा दृष्टीला न पडणारे बाळ त्याच्या या कैदेमुळे अधिकाधिक अपंग बनत जाते. लेखिकेचा निष्कर्ष; आईबापांना सी. पी. बाळाला बाहेर नेण्याची कितीही लाज वाटत असो, आपल्या दुर्दैवी बाळाची मोठ्या माणसांनी, बरोबरच्या सवंगड्यांनी कुचेष्टा करू नये, बाळाचे त्या कुचेष्टेपासून संरक्षण करावे अशी त्यांची प्रेमापोटी इच्छा असते. जगाशी संपर्क तोडल्याने आईबाप बाळाचे नुकसान करतात.

 एक आई आणि तिचे बाळ. ते निरोगी असो, की व्यंगाचे असो, महत्त्वाचा

अन्वयार्थ - एक / १३९