पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मूल अपंग जन्मले; त्याचे ओठ हलत नाहीत; तोंडातून सतत लाळ गळते; चेहऱ्यावर एक बावळटपणाचा भाव; हातपाय पाहायला गेले तर व्यंग असे काही नाही; पण त्याच्या हालचालीत एक काही विचित्र वेगळेपण, बाळाच्या सर्व हालचालीत त्या संतुलनाचा अभाव जन्मानंतर थोड्याच दिवसांत लक्षात येतो. आईचे सगळे प्रेमसुद्धा वर्षानुवर्षे प्राणांताने वाट पाहिली, ते आपलं बाळ अपंग आहे; हाय रे दैवा! आपल्याच नशिबी असे बाळ कां यावे? अशी वात्सल्य आणि दुरावा एकत्र असलेली आईची नजर त्या एवढ्याशा जीवाच्यासुद्धा पटकन ध्यानात येते. बापाची तर गोष्टच वेगळी. हसतेखेळते निरोगी बाळ असते तरी त्याचे न्हाऊन माखून झाले. तीट काजळ झाले, की बाळ पुन्हा दुपटे ओले तर करणार नाही ना? या चिंतेत बहुतेक बाप बाळांना जवळ घेतात. बाळ सी. पी. असेल तर मग विचारायलाच नको. अशा बाळांचे आपल्या सर्व महत्त्वाकांक्षावर तिलांजली सोडून सर्वस्व देऊन संगोपन करणारेही बाप नसतात असे नाही; पण ते अपवाद. बहुतेक पुरुषांना व्यंगाचे मूल डोळ्यासमोर देखील नकोसे वाटते. बाळाच्या आणि त्याच्या आईच्या भावनांचा विचार न करता ते त्याची उघडउघड हिडीसफिडीससुद्धा करतात. छोटे बाळ त्याच्या सगळ्या बौद्धिक कमजोरीच्या आरपारही हा दुरावा अचूक टिपते.
 सी. पी. बाळांच्या आईबापांच्या मनात एक अपराधीपणाची आणि न्यूनगंडाचीही भावना असते. आपल्यातील काही शारीरिक दोषांमुळे, कमतरतेमुळे बाळात हा दोष उतरला की काय? याची चिंता दोघांनाही लागते. आपल्या काही व्यसनांचा, बाळंतपणात केलेल्या औषधोपचारांचा परिणाम म्हणून बाळाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले काय? याची त्या दोघांनाही जिवघेणी रुखरुख लागलेली असते.
 सी. पी. बाळाचे आईवडील त्यामुळे बाहेर गेले तर बाळाला बरोबर कधी नेत नाहीत. आपले बाळ बघितले म्हणजे लोक आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात; आपली मनात कीव करतात. आपल्याला अपराधी मानतात या अनुभवाची त्यांना मोठी धास्ती वाटते. आजूबाजूला इतर मित्रमैत्रिणींची मुले हसून खेळून धिंगाणा घालत असताना आपले बाळ मात्र वेडेविंद्रे दिसते, तेव्हा त्याला बाहेर नेणेच नको म्हणून आईबाप, निदान आईतरी स्वतःला कोंडून घेते आणि बाळाला कोंडून ठेवते.
 बाळाचा शिक्षक-जग

 प्रभा घारपुरच्या 'साधना'मध्ये एक प्रयोग मोठ्या लक्षवेधीपणे मांडला आहे. अव्यंग जन्मलेले बाळसुद्धा वाढते कसे? हाडामांसाचा केवळ गोळा असलेले

अन्वयार्थ - एक / १३८