पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाची कामगिरी म्हणजे लोकशाही चालू ठेवण्यातील आपले यश..."
 "आर्थिक क्षेत्रातही काही यशकथा आहेत. उदाहरण : शेती." हे यश, गव्हाचे उत्पादन वाढवण्यासंबंधी आहे. इतर सर्व बाबतीत केनिया, पाकिस्तान, इंडोनेशियासारखे देशही आपल्या पुढे गेले आहेत हे अहवालात तळटीप देऊन स्पष्ट केले आहे.
 बाजार व्यवस्थेचा बाजार
 मधूनमधून उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे टीकेची धार बोथट होते, की अधिक बोचक होते हे वाचकांनी ठरवावे.
 वस्तुतः हे 'मार्क अँटनी' शैलीचे भाषण करण्याची जबाबदारी अर्थशास्त्रज्ञांची नाही, पंतप्रधानांची आहे किंवा फार तर वित्तमंत्र्यांची आहे. जगदीश भगवतींनी ही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली याचे अर्थ दोनच निघू शकतात. एक, मसुदा तयार करण्यात सरकारी हात असला पाहिजे किंवा दोन जगदीश- भगवती आपले नवीन वित्तमंत्री होणार आहेत.
 या दुसऱ्या संशयाला पुष्टी मिळण्यासारखा आणखी एक मोठा गमतीदार प्रकार अहवालात पाहायला मिळतो. आर्थिक सुधारांना कोणाकोणाकडून विरोध होईल, विरोधकांकडून काय युक्तिवाद केले जातील आणि त्याला उत्तरे कशी द्यावीत याचे मोठे तपशीलवार विवेचन सोडून, खुल्या व्यवस्थेकडे जातो आहो काय? आपण गरिबी हटाव सोडून, आर्थिक विकासाकडे जातो आहो काय? आपण परदेशी दबावाला शरण जातो आहो काय? आपण आतापर्यंत जे जे केले ते सगळे सोडून देत आहो काय? या असल्या आक्षेपांना द्यायच्या मुत्सद्दी उत्तरांचे नमुने अहवालात देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, आर्थिक सुधारांचा प्रभावी प्रचार यशासाठी महत्त्वाचा आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवती म्हणतात -
 "...पंतप्रधान राजीव गांधींच्या अमदानीत आर्थिक सुधार मंदावले आणि सोडून देण्यात आले, याचे कारण प्रचाराचे अपयश, कार्यक्षमता वाढवण्याकरिता केलेल्या सुधारणा म्हणजे 'यप्पी' फॅशन वाटू लागल्या. हिंदुस्थानातील 'यप्पी' म्हणजे ज्यांना आपण 'डून स्कूल' म्हणतो ते लोक! '१० जनपथ' ची यावर काय प्रतिक्रिया होते ते पाहणे मनोरंजक ठरेल.
 शिकवणी, मुत्सद्दीपणाची

 भगवती, श्रीनिवासन् यांनी अर्थशास्त्री म्हणून सत्य सांगितले, परखडपणे सांगितले. ते सांगताना मधूनमधून नेहरूंची भलावण करणे त्यांना आवश्यक

अन्वयार्थ - एक / १३५