पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकांना शिक्षा नको
 समाजवादी प्रयोगाच्या भीषण घोडचुकीची रशियन लोकांना पुरी खात्री पटली आहे. नव्या नेतृत्वालाही त्याबद्दल मनात काही शंका नाही; पण ज्या लोकांना ८० वर्षे उद्योजकता म्हणजे काय? याच्या वासापासूनसुद्धा दूर ठेवण्यात आले, त्यांनी उद्योगधंदे चालू करावे कसे? हिंदुस्थान हा तसा दरिद्री देश; पण जुन्या सोव्हियत युनियनचा प्रवासी नागरिक दिल्लीतील जनपथवरील दुकाने आणि फुटपाथ ओसंडून जाणारा माल पाहून चकित होतो आणि भारतीयांच्या उत्पादकतेची वाहवा करतो. रशियन लोकांनी दिशा बदलली आहे. चुकीची वाट सोडून त्यांना नेमके उलट्या दिशेने वाटचाल करायची आहे. ८० वर्षांच्या समाजवादी प्रयोगाची किमत त्यांना मोठ्या कठोरपणे चुकवायची आहे. समाजवादावर, कॉमेड्सवर, मार्क्स, स्टॅलिन, लेनिनवर... माणसांना बाहुली करणारे 'महाराक्षस' म्हणून कितीही राग आला, तरी तो राग रशियन नागरिकांवर काढणे महाचूक होईल.
 जगातील संपन्न राष्ट्रे रशियाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत; पण काहीसे हात राखून कंजुषपणे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे नाक मातीत घासण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण दोस्त राष्ट्रे व्हर्सायच्या तहाच्या भयानक परिणामांचा धडा शिकलेली होती. जित राष्ट्रांना ज्येत्यांनी इतके दिलदारपणे वागवले आणि इतक्या मोकळ्या हाताने मदत केली, की त्या मदतीच्या 'मार्शल' योजनेचे वर्णन विन्स्टन चर्चिलनी "The most unsordid act in human history" या शब्दांत केले. जगाला आज पुन्हा एकदा जुन्या सोव्हियत युनियनच्या नागरिकांबद्दल असाच दिलदारपणा दाखवण्याची गरज आहे. समाजवादी साम्राज्य संपले. लोक भणंग झाले. धर्माधर्मात प्रचंड कत्तली सुरू झाल्या. "बरी या कम्युनिस्टांची खाशी जिरली!" असे म्हटले तर काय होईल?
 आता रशियन हिटलर?
 जर्मनीच्या भीषण अपमानातून हिटलरचा उदय झाला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ लनायोनेल रॉबिन्स यांनी हिटलरला 'चलनवाढीचा दत्तक पुत्र' म्हटले आहे. हुकूमशहाच्या उदयाला वायमार जर्मनीइतकीच रशियन भूमी सुपीक आहे.

 महासत्ता म्हणून पाच दशके मिरवलेल्या राष्ट्राला आजची अपमानास्पद अवस्था सहन होण्यासारखी नाही. असले जिणे जगण्यापेक्षा एखाद्या नव्या हिटलरच्या मागे ते आनंदाने जातील. गुडघ्यापर्यंत पोचणाऱ्या खिळेरी टाचांच्या बुटांचे आवाज पुन्हा निनादू लागतील, कॉम्रेड स्टालिनच्या क्रूरकर्माना निदान

अन्वयार्थ - एक / १३०