पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामगारांचे तारणहार बसले आहेत. ते करतात ते सगळे योग्यच असते. त्यांच्यापेक्षा चांगला निर्णय घेणे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शक्यच नाही. असली शिकवण सर्वांच्या मनात इतकी भिनलेली होती, की हरेक माणूस निव्वळ ठोंब्या-बाहुले बनलेला होता.
 समाजवादी व्यवस्था असतानाही रशियन नागरिकाचे आयुष्य काही मोठे संपन्न होते असे नाही. दीड खोलीच्या खुराडेवजा घरात सगळे कुटुंब राहायचे. जेवणात वापरात येणाऱ्या सगळ्याच वस्तू कमी प्रतीच्या; पण डोक्याला निर्णय घेण्याचा ताण न देता हे सगळे मिळते आहे ना! बस आनंद आहे. "कॉम्रेड...झिंदाबाद, कामगारांचा तारणहार झिंदाबाद" आणि त्याहीपेक्षा "व्होडका झिंदाबाद!"
 प्रयोगशाळेत संशोधनासाठी छोटे पांढरे उंदीर वापरले जातात. उंदीर हा मुळात मोठा चपळ, कोठूनही कोठे येऊ-जाऊ शकणारा सर्वगामी प्राणी. म्हणून तर तो विद्या देवतेचे वाहन! पण पिढ्यान्पिढ्या प्रयोगशाळेतील खोक्यात वीण झाल्यामुळे हे पांढरे उंदीर आता दोन इंच उंचीच्या पुठ्याच्या खोक्याच्या कडेवरूनही उडी मारू शकत नाहीत. रशियन नागरकिांची अवस्था ८० वर्षांच्या समाजवादी व्यवस्थेनंतर या पांढऱ्या उंदरासारखीच झाली होती.
 फरपट चालूच
 भूक सहन करणे हिंदुस्थानसारख्या उष्ण प्रदेशातही कठीण आहेच; पण त्यापेक्षा शतपटींनी रशियासारख्या मरणाची थंडी असलेल्या प्रदेशात रिकाम्या पोटाने राहणे दुष्कर आहे. कडाक्याच्या थंडीत एखाद्या पावासाठी, एकदोन अंड्यांसाठी, रशियन लोकांना थंडीत कुडकुडत रांगा धरून उभे राहावे लागते. दुसऱ्या महायुद्धात महापराक्रम गाजवलेल्या एका सेनापतीस दोन दिवसाची भूक भागावी म्हणून आपला भरजरी गणवेश हँगरवर लावून विकण्यासाठी फूटपाथवर यावे लागले. आज परिस्थिती इतकी बिकट आहे, की झ्वाइंगच्या वर्णनाचा पुरा विदारक प्रत्यय यावा.

 अश्लील वाङ्मयाचे गठ्ठे मॉस्कोत येऊन पडत आहेत. या पुस्तकांची रशियन रूपांतरे करण्याकरिता भाषांतरकर्त्यांना मोठी मागणी आहे. एके काळी जग बदलण्याची आणि 'होगे कामयाब'च्या घोषणा देणारे तरुण 'व्होडका'च्या पेल्यात दुःख आणि भूक बुडवीत आहेत. पोटाची खळगी भरण्याकरिता १०-१२ वर्षांच्या मुलींपासून मोठ्या बायांपर्यंत अनेकांना रस्त्यावर फेऱ्या घालाव्या लागत आहेत.

अन्वयार्थ - एक / १२९