पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वायमार जर्मनीत सगळेच उफराटे झाले. पिशव्या भरून नोटा घेऊन दुकानात जावे आणि खिशातून माल आणावा! आज एक पिशवीभर नोटा द्याव्या लागल्या तर उद्या निदान दोन पिशवीभर लागतील अशी धास्ती. त्यामुळे मातीमोलाच्या नोटा टाकून, काय मिळेल ती वस्तु खरिदण्याकरिता लोक धावू लागले. झ्वाइंगच्या कादंबरीतील एका सरदार पात्राचा वडील मुलगा कष्टाळू आणि प्रामाणिक असतो, तर त्याचा धाकटा भाऊ उनाड आणि रंगेल! धाकट्याने पिऊन मोकळ्या केलेल्या रिकाम्या बीअरच्या बाटल्यांनी पुरे एक कोठार भरलेले! चलनाचा महापूर आला, कष्टाळू सरदारपुत्राने साठवलेल्या नोटा, कर्जरोखे, शेअर वगैरे सगळे कवडीमोलाचे झाले. याउलट उधळ्या सरदारपुत्र रिकाम्या झालेल्या बीअरच्या बाटल्या थोड्या थोड्या विकून आरामात राहू शकत होता. आणखी एक कथा, दोन बहिणी, एक शिक्षिका आणि दुसरी जरा चंट. शिक्षिकेला काय घडते आहे हे समजतसुद्धा नाही. दिवसेंदिवस उपवास काढण्यापलीकडे तिला काही गत्यंतर राहत नाही, तिची बहीण रस्त्यावर जाऊन राजरोस देहविक्रय करून मजेत राहू शकते. कादंबरीत शेवटी नाइलाजाने सोज्वळ शिक्षिकाही रस्त्यावर येऊन फेऱ्या घालू लागते.
  'वायमार' रशिया
 स्टीफन झ्वाइंगच्या या कादंबरीची आठवण होण्यासारखीच परिस्थिती आजच्या रशियात आहे. एके काळची महासत्ता समाजवाद्यांच्या बेहिशेबी अर्थकारणाने पोखरून टाकलेली. सोवियत युनियनचे विसर्जन झाले आणि आज रशियातील परिस्थिती १९२० सालच्या जर्मनीसारखी झाली आहे. एके काळी दहा डॉलरला आठ रुबल असा अधिकृत विनियमाचा दर होता, आज शेवटच्या माहितीप्रमाणे एक डॉलर, मिळायला ६०० रुबलसुद्धा पुरे पडणार नाहीत. अर्थव्यवस्था पुरी ठप्प झाली आहे. नोटांचा इतका महापूर झाला, की जुन्या नोटा रद्द करून नव्या नोटा प्रचारात आणण्याचा सरकारने प्रयत्न केला, तोही फसला.

 लोक मोठे हवालदिल झाले. आठ दशके त्यांची पढवून पढवून खात्री पटवण्यात आली होती, की मायबाप सरकार सगळ्या काही चिंता वाहते. या समाजवाद रूपी स्वर्गात सामान्य जनांना चिंता करण्याची काही चिंता आवश्यकताच नाही. त्यांनी नेमून दिलेले काम कसोशीने मन लावून करावे, त्याबद्दल जो काही रोज मिळेल तो आनंदाने घ्यावा. समाजवादी स्वर्गाचे गुणगान करावे म्हणजे झाले! आपल्या कारखान्यात काय तयार होते? महाग का? हा विचार करण्यासाठी कारखान्यातील कम्युनिस्ट पार्टीचा सेक्रेटरी आहे, क्रेमलिनमध्ये

अन्वयार्थ - एक / १२८