पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






आता रशियन 'हिटलर?'


 स्टीफन झ्वाइंगची एक प्रसिद्ध कादंबरी कथानकाचा काळ- पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतरच्या पाच-दहा वर्षांतील व्हर्सायच्या तहाने जर्मनीतील सुबत्तेचे प्रांत दोस्त राष्ट्रांनी काढून घेतले होते. महायुद्धातील विध्वंसाबद्दल जर्मनीवर प्रचंड खंडणी लादलेली होती, जर्मनीतील उद्योगधंदे, शेती, व्यापार उदीम सगळेच थंडावले होते, सरकारने आपला खर्च चालवण्याकरिता नोटा छापण्याचा तडाखा लावला होता.
 महागाई आपल्याही अंगवळणी पडली आहे. चलनवाढीचा नको तितका अनुभव आहे. त्यापलीकडचा टप्पा काय म्हणावे? चलन व्यतिरेक म्हणून या. चलन व्यतिरेकाच्या महापुराने जर्मनी व्यापून टाकला होता. जानेवारी १९२२ मध्ये एक मार्क टाकून जी वस्तू मिळे तिलाच जून १९२३ मध्ये १ निखर्व (म्हणजे एकावर अकरा शून्य) पडू लागले. इवाइंगची कादंबरी महाचलनवाढीच्या समाज आणि व्यक्तिजीवनावर होणाऱ्या परिणामांचे बारकाईने चित्रण करते.
 चलन स्थिर तर नीतिमत्ता ठीक
 समाजातील नीतिमत्तेचा आधार काय? ईश्वरी धाक? विश्वाचा कोणी शास्ता आहे आणि त्याच्यापुढे एक दिवस हिशेब द्यायला उभे राहावे लागणार आहे. सगळे जग बदलले तरी हे सत्य शाश्वत आहे. सर्व धर्मांनी घालून दिलेल्या या धास्तीमुळे नीतिमत्तेचा आधार असो किवा नसो, नीतिमत्ता टिकण्याकरिता चलनाच्या विनिमयाचा दर स्थिर असणे आवश्यक आहे हे निश्चित. रुपयाची किमत स्थिर असली तर कष्ट, काटकसर, बचत, गुंतवणूक, दानधर्म, हे सगळे गुण ठरतात. चलनाची किमत घसरू लागली, की या सगळ्या सद्गुणांची राखरांगोळी क्षणार्धात होते.
 मानी राष्ट्रांची फरपट

 खिशात पैसे घेऊन जावे आणि पिशवीतून माल आणावा ही जुनी पद्धत.

अन्वयार्थ - एक / १२७