पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भारताची खरी संसद


 वार्षिक परीक्षा एकदा आटोपली. शेवटचा पेपर टाकला म्हणजे मुले जशी खुश होतात तसे, दिल्लीतील सगळ्या मंत्रालयात 'सुटलो एकदाचे' असे वातावरण पसरले. दरवर्षी हे असेच घडते. जुलै महिन्याचा पहिला आठवडा जसजसा जवळ येत जातो तसतसे दिल्लीच्या सगळ्या 'भवनात' वातावरण तंग होत जाते. शाळेच्या तपासणीसाठी 'दिपोटी' येणार असला म्हणजे सगळ्या मुलांच्या वह्या, पुस्तके ठाकठीक करून घेण्यात येतात. त्याचप्रमाणे सगळी मंत्रालये आपापली कामगिरी सजवून, वाढवून सुबक रीतीने पुढे मांडायच्या धांदलीत असतात.
  'दे दान' परिषद
 ही सगळी घाईगर्दी कशासाठी? दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पॅरिस शहरी एक बैठक भरते. या बैठकीत भारताला मदत करणाऱ्या सगळ्या श्रीमंत राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. थोडक्यात ही आपली 'दे दान' परिषद.
 जुलै महिना आला, की वर्षभर मारलेल्या देशाच्या प्रगतीच्या बढाया आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या वल्गना थंडावतात. हातामध्ये कटोरी घेऊन भारताचे शिष्टमंडळ या बैठकीस जाते. बैठकीचे कामकाज शुद्ध तांत्रिक स्वरूपाचे. इतर सर्व मंडळी अर्थकारणातील जाणकार दर्दी असतात. तस्मात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व वित्तसचिव करतात, कोणी मंत्री नाही.

 आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीतील तूट भरून काढण्यासाठी 'दे दान' मंडळाने चांगली भरघोस मदत करावी अशी विनवणी करण्याकरिता हे शिष्टमंडळ जाते. अर्थातच दाते याचकाची परीक्षा घेतात. त्याला प्रश्न विचारतात. देशातील अर्थव्यवस्थेबद्दल, अंदाजपत्रकी त्रुटींबद्दल, सार्वजनिक क्षेत्रांच्या कामगिरीबद्दल, अकार्यक्षमतेबद्दल इ. इ. या प्रश्नांना उत्तर म्हणून सचिव मोठ्या अजिजीने

अन्वयार्थ - एक / ११५