पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चेंबरमध्ये हर्षदचे मोठे स्वागत झाले आणि कसेबसे बी. कॉम. पास झालेल्या हर्षदने अर्थ सचिवांना बचत, भांडवल गुंतवणूक आणि देशाचा आर्थिक विकास, या विषयावरील आपले सिद्धांत ऐकवले. नवे आर्थिक धोरण देशात भरभराट आणणार आहे ही ग्वाही देणारा खास साक्षीदार म्हणजे हर्षद.
 हर्षद मेहताचा सिद्धांत काही महालनोबिस सिद्धांतापेक्षा जास्त पोरकट नाही. महालनोबिसांचे म्हणणे भारी उद्योगधंद्यांत पैसे टाका भरभराट होईल. हर्षदचे म्हणणे, पैसे शेअर बाजाराकडे वळवा; शेअर बाजार चढता राहिला म्हणजे नवीन उद्योगधंद्यांकरिता भांडवल उभे करणे सहज शक्य होईल आणि देशाची भरभराट होईल. त्यासाठी काही हातचलाखी करावी लागेल; पण महाविद्वान महालनोबिसनेही तेच केले होते. हर्षद मेहताकडे अर्थशास्त्रातील डॉक्टरेट असती तर त्याला नियोजन मंडळावर नक्कीच नेमले असते.
 देशाचा विकास म्हणजे काही आकड्यांचा, समीकरणांचा आणि चलनांचा खेळ आहे असे मानणाऱ्यांच्या हाती भवितव्याच्या दोऱ्या जातात. निदान काही काळ तरी जातात. एवढी दुर्दैवी जाणीव या महालनोबिस शताब्दी आणि हर्षद प्रकरण या दुहेरी योगायोगातून झाली तरी पुरे.

(१६ जुलै १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ११०