पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोघेही सिडने, वेब, बर्नार्ड शॉ, टॉनी, कोल, हॅरॉल्ड लास्की आणि फेबियन सोसायटीच्या काळातच वावरत होते. त्यांच्या या कल्पनारम्य जगात सौजन्य, ऋजुता आणि बौद्धिक, कुतूहल नांदत होते. त्याच्याबरोबर अर्थकारण प्रामुख्याने सामाजिक, नैतिक निष्ठांशी जोडले होते. समाजवादी व्यवस्थेत काही दुर्लंघ्य प्रशासकीय अडचणी आहेत. आर्थिक प्रेरणा आणि सामाजिक बांधणी यासंबंधी गंभीर अडचणी आहेत, याची फारशी जाणीव नव्हती."
 प्रत्येक दुर्दैवी ऐतिहासिक पुरुषाच्या आसपास एक विचित्र व्यक्तिमत्त्व उभे राहते; संभाजीबरोबर कलुषा कब्जी, रशियातील झारबरोबर रासपुतीन, तसेच पंडितजीबरोबर डॉक्टर प्रशांतचंद्र महालनोबिस.
 आणखी एक अर्थकारणी
 महालनोबिस या ग्रहणातून देश सुटत असतानाच दुसरा एक मोठा विचित्र योगायोग घडून येतो आहे. आर्थिक विकासासंबंधी आणखी एक थिल्लर विचार मोठ्या गंभीरपणे मांडला जातो आहे. हा मांडणारा कोणी अर्थशास्त्रज्ञ नाही, परदेशांतून पदव्यांच्या साधा बी. कॉम आहे; पण तरीही बाजारपेठेत जास्तीत जास्त धुमाकूळ घातल्याचे श्रेय त्याच्या लेखी आहे. त्याचे नाव हर्षद मेहता.
 लॉर्ड केन्स हा अर्थशास्त्रज्ञांचा 'मुगुटमणी' प्रचंड बुद्धिमत्ता, देदीप्यमान शैक्षणिक पार्श्वभूमी, सुंदर सोपी काव्यमय गद्यशैली, याबद्दल केन्स प्रसिद्ध आहे; पण अर्थशास्त्रज्ञांना त्यांचे विशेष कौतुक वाटते ते काही काळ शेअरबाजारात अचूक खेळी करून केन्सने भरपूर कमाई केली. तसे बहुतेक अर्थशास्त्री बोलण्यात, लिहिण्यात, तरबेज असतात; पण प्रत्यक्ष काही उलाढाल करायची त्यांची ताकद शून्यच असते. त्यामुळे बाजारपेठेतही यशस्वी झालेल्या केन्सचे मोठे नाव आहे.

 या फूटपट्टीने बघायचे झाले तर हर्षद मेहतालाही अर्थशास्त्रज्ञ मानायला पाहिजे आणि काही काळ तरी त्याला अशी मान्यता मिळाली. महालनोबिसना नेहरूंनी बोलावून घेतले; हर्षदला तसे कोणी चालवले नाही आणि बोलावले असते तरी तो गेला नसता. पगार, भत्त्याच्या, तुकड्याकरिता धावणारा तो काही पोटभरू प्राध्यापक नाही; पण २९ फेब्रुवारी १९९२ रोजी दूरदर्शनने हर्षदच्या अंदाजपत्रकावरील प्रतिक्रियेला भली मोठी प्रसिद्धी दिली. ११ जानेवारी १९९२ रोजी त्याच्या कामगिरीत कोणतीही अडचण आणू नये असे वित्तमंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने मुद्दाम मुंबईला येऊन शेअर बाजारातील अधिकाऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर महिन्याभरात वित्त मंत्रालयाचे प्रमुख सचिव गीता कृष्णन यांच्या

अन्वयार्थ - एक / १०९