पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरहद्दीवर चिनी आक्रमणाच्या वेळी भारताची नाचक्की झाली. तसाच काहीसा प्रकार नेहरू-महालनोबिस संबंधांत झाला. वास्तवापासून दूर कल्पनाविश्वात रममाण होणाऱ्या काव्यप्रकृतीच्या लोकांना इंग्रजीत 'कमलभक्षी' म्हणजे Lotus Eaters म्हटले जाते. जवाहरलाल आणि प्रशांतचंद्र महालनोबिस या दोन 'कमलभक्षी'ची जोडी जमली आणि देशाचे दुर्दैव ओढवले.
 कोलकत्त्याचा हस्तीदंती मनोरा
 कोलकत्त्यातील संख्याशास्त्र संस्थेला राष्ट्रीय संशोधन संस्था म्हणून मान्यता द्यावी असे बिल संसदेत मांडण्यात आले. ते खुद्द पंडितजींनी मांडले. भाषण करताना पंडितजी म्हणाले, "अशा विद्वानांच्या शास्त्रीय कामाच्या खर्चासाठी त्यांना लोकांपुढे येऊन तोंड वेंगाडण्याची गरज पडता कामा नये. कोलकत्त्याला हस्तीदंती मनोरा तयार करण्यात आला. संस्थेच्या शाखा, कामाचा पसारा वाढला. शेकडो अर्थशास्त्री, संख्याशास्त्री पोटाला लागले. या संस्थेत होणाऱ्या विशुद्ध संशोधनाच्या आधारावर देशातील कोट्यवधी उपाशीपोटी कंगालांचे भवितव्य ठरायचे होते!"
 शुद्ध हातचलाखी
 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारी उद्योगधंद्यांवर भर देण्यात आला, हा निर्णय जणू काही या विद्वान पंडिताच्या सर्वसाधारण जनास अगम्ये अशा गणिती समीकरणातून अपरिहार्यपणे आला असा आभास तयार करण्यात आला. समाजवादी रशियात भारी उद्योगांवर भर दिला जातो त्या पद्धतीने हिंदुस्थानातही असेच प्राधान्य देणे हे शास्त्रीयदृष्ट्या अपरिहार्य आहे असा दबदबा पसरवण्यात आला. सत्यस्थिती ही, की गणिती समीकरणातून असा काही निष्कर्ष निघत नव्हता. समीकरण तटस्थ होते, त्यातून पाहिजे ते उत्तर काढता आले असते. या निष्कर्षात डॉक्टर साहेबांची सरळ सरळ हातचलाखी होती. एकूण गुंतवणुकीपैकी ३३% भारी उद्योगधंद्यांवर झाली पाहिजे हे गृहीत धरूनच त्यांनी बाकीची उत्तरे काढली. नेहरूंना काय पाहिजे होते याचा अचूक अंदाज घेऊन डॉक्टरांनी उत्तर काढले होते. नेहरू खुश झाले, मग कोणा अर्थशास्त्रज्ञाने फारसे फाटे फोडले नाहीत. ज्यांनी पंडितजींना विरोध केला, ते बाजूला फेकले गेले. हव्या असलेल्या व्यवस्थेचे शास्त्रीय वाटणारे समर्थन देणारा दुसरा एक 'कमलभक्षी' भेटला होता.
 कल्पनारम्य विश्वातील युगुल

 गालब्रेथ यांनी या जोडीचे वर्णन मोठे मार्मिक केले आहे. ते म्हणतात, "हे

अन्वयार्थ - एक / १०८