पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एक गणिती समीकरण, त्यात काही इंग्रजी अक्षरे, काही ग्रीक, त्यामुळे समीकरणात काही प्रचंड गूढ विद्वत्या असल्याचा आभास. समीकरणाचा थोडक्यात अर्थ काय? कोणच्याही देशातील लोकांची बचत करण्याची ताकद किती? आणि त्याच देशात भांडवलाची उत्पादकता किती? या दोन प्रश्नांचे उत्तर मिळाले, की सुयोग्य आणि संतुलित विकासाची गती साध्या गुणाकाराने मिळते, असा या समीकरणाचा अर्थ. या सगळ्या जडजबाल गुंतागुंतीचा अर्थ काय? हिंदुस्थानात एकूण उत्पादनाच्या १२% बचत होते असे समजले आणि १०० रुपयाची भांडवल गुंतवणूक केली तर २५% वार्षिक उत्पादनात वाढ होते असे धरले तर २५% गुणिले १२% म्हणजे ३% दराने देशाचा विकास होणे आवश्यक आहे; पण व्यवहारात बचतक्षमता आणि उत्पादकता या गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत. किंबहुना त्या बदलणे हे कोणत्याही अर्थव्यवस्थेचे काम आहे. त्या स्थिर आहेत असे गृहीत धरले तर हे समीकरण २+२=४ इतके स्वयंसिद्ध आणि निरर्थक होते. या असल्या पोरकट खेळाने त्या काळी अर्थशास्त्री मोठे स्तिमित आणि प्रभावित झाले होते.
 दोन 'कमलभक्षी'
 महालनोबिस हे तसे मोठे बहुरंगी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. मुळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे विद्यार्थी; पण त्यांना संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, हवामानशास्त्र, संगीत अशा अनेक विषयांत मोठी रुची होती. तागाचे पीक, वेगवेगळ्या वंशांच्या माणसांच्या शरीररचना, हवामानाचे अंदाज, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत फिशर आणि शेवार्ट या संख्याशास्त्रज्ञाच्या पद्धती त्यांनी वापरल्या. शास्त्रज्ञ म्हणून काही मूलभूत संशोधन त्यांच्या नावाने रुजू नाही; पण हिंदुस्थानातील आकडेवारी गोळा करण्यासंबंधी केंद्रीय यंत्रणा आणि नमुना पद्धतीने पाहणी करण्याची राष्ट्रीय व्यवस्था यांच्या उभारणीत महालनोबिस यांचे मोठे श्रेय आहे. शास्त्रज्ञापेक्षा संघव्यवस्थापकापेक्षा ते शास्त्रप्रशासक अधिक होते. खेळाडूपेक्षा संघव्यवस्थापकाचा तोरा अधिक अशीच परिस्थिती; त्यांचा स्वभाव, प्रकृती आणि व्यक्तिमत्त्व 'रसिकराज' पंडित नेहरूंच्या प्रकृतीशी जुळणारे होते आणि या दोघांचे चांगलेच जुळलेही.

 देशाचा विकास-कोट्यवधी लोकांच्या डोळ्यातील आसवे पुसण्याचा कार्यक्रम गंभीर आणि कठोर परिश्रमाचा; पण रसिक राजाच्या दृष्टीने गरिबी दूर करणे म्हणजे इतिहासाने त्यांच्याकडे सोपवलेली रोमहर्षक कामगिरी होती. पुढे व्ही. के. यांनी कौल नावाच्या लष्करी तरुण अधिकाऱ्यास वर चढवले आणि इशान्य

अन्वयार्थ - एक / १०७