पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इस्त्राईलसारख्या दोस्त राष्ट्राला सगळे काही विसरून तडजोड स्वीकारायला भाग पाडण्यात येत आहे. उत्तर कोरियाला शिस्त लावली, की त्यानंतर मोर्चा हिंदुस्थान आणि पाकिस्तानकडे वळणार आहे.
 त्रिशूल आणि अणुबॉम्ब
 या दोन्ही देशांबद्दल जगाला मोठी चिंता आहे. देशातील मूठभर पाश्चात्त्य विद्याविभूषित लोकांनी भीक, मदत, उसनवारी, खरेदी किंवा चोरीच्या मार्गाने बरेचसे तंत्रज्ञान मिळवले आहे आणि आधुनिकतेचा देखावा केला आहे. एवढा भाग सोडल्यास बाकी सारा देश मध्ययुगातच आहे. हिंदुस्थानात अजूनही मंदिर-मशीद, मंडल असल्या प्रश्नांवर सत्तांतर होऊ शकते आणि 'डॉन क्विक्झोटा'च्या हाती सत्तेच्या खुर्चीबरोबर अणुबॉम्ब जाऊ शकतो. पाकिस्तानमध्ये तर आजच जबाबदार नेतेदेखील काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अणुबॉम्बची गरज असल्याचे खुलेआम बोलतात. काश्मीर हातचा जाण्याची वेळ आली तर एका बॉम्बमध्ये सारा प्रश्न संपवून टाकावा असे मानणारे हिंदुस्थानातही अनेक आहेत.
 आधी पात्रता कमवावी
 नवी जागतिक व्यवस्था अशी स्थिती स्वीकारू शकतच नाही. विकासाकरिता आणि रोजच्या रोटीकरिता तुम्ही मदतीवर अवलंबून आहात, स्वतःच्या प्रज्ञेने तुम्ही अजून १०० वर्षे तरी अणुबॉम्ब बनवण्याच्या अवस्थेस पोचला नसता; खुल्या व्यवस्थेसाठी परदेशी गुंतवणूकदारांची तुम्ही याचना करता आहात, मुकाट्याने काश्मीर प्रश्नावर समझोता करा आणि अणुबॉम्ब बनवण्याच्या वाह्यात कल्पना सोडून द्या. असा दबाव ते दोन्ही देशांवर आणणार आहेत.
 भारत आणि पाकिस्तान सरकारे अडेलतट्टूपणा करणार आहेत. दोन्ही देशांच्या लोकांनी सुज्ञपणा दाखवला पाहिजे. जगातील कोणताही प्रश्न अणुबॉम्बच्या संहाराने सोडवण्याच्या योग्यतेचा नाही; तडजोड करावी लागली, असा डंख मनाला लागला तरी त्याचे दुःख शमवण्याकरिता साऱ्या पृथ्वीगोलाचे भवितव्य धोक्यात आणणार नाही; अणुबॉम्ब बाळगण्याची पात्रता कमवू आणि मगच तो बनवू अशी स्पष्ट भूमिका लोकांनी घेणे आवश्यक आहे.

(१५ जुलै १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १०५